चाकण : पुढारी वृत्तसेवा : मान्सून यंदा अद्यापही दाखल झालेला नाही. काही भागांत झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा अपवाद सोडल्यास पावसाने या भागाकडे पाठच फिरवली आहे. काही ठिकाणी पावसाचा लपंडाव सुरू असला, तरी चाकण परिसरात अजून मान्सूनपूर्व पाऊसदेखील झालेला नाही. त्यामुळे पंचक्रोशीतील पेरण्या तर दूरच, पण पेरणीपूर्व मशागतीची कामेही संथ गतीने सुरू आहेत. पावसाअभावी यंदा पेरण्या लांबणीवर पडणार आहेत.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागात धूळवाफेवर अत्यल्प भात उत्पादक शेतकर्यांनी पेरणी केली असली, तरी शेतकर्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. खेड तालुक्यात मागील आठवड्यात काही भागांत पावसाने दमदार सलामी दिली. मात्र, अजूनही पेरणीसाठी अपेक्षित पाऊसच झालेला नाही. पावसाच्या लहरीपणामुळे पेरणी करावी का नाही, अशा संभ—मात शेतकरी आहे. कृषी विभाग आणि जाणकार मंडळींनी 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे बी-बियाणे खरेदी करून ठेवले असताना अजून पेरणीसाठी शेतकर्यांना वाट पाहावी लागणार आहे.
यंदा हवामान खात्याने व्यक्त केलेल्या पावसाच्या चांगल्या अंदाजामुळे शेतकर्यांनी आर्थिक ओढाताण करून बी-बियाणे, खते खरेदी केली आहेत. नियोजन करीत शेतांची नांगरट केली. मात्र, पुरेसा पाऊस न झाल्याने रानातील मातीची ढेकळेसुद्धा फुटलेली नाहीत. पावसाने अजून विलंब केल्यास पेरण्या लांबणीवर पडू शकतात.
पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या वर्षी कांदा उत्पादकांची झालेली फरपट तसेच इतर रब्बी पिकांत शेतकर्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने शेतकर्यांचा भर या वर्षी खरीप उत्पादनावर वाढला आहे. सोयाबीनला बाजारात मिळत असलेला तुलनेने समाधानकारक दर पाहता शेतकरी सोयाबीनकडे वळला आहे. मात्र, पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
खेड तालुक्याच्या काही भागांतील पाणीपातळी खालावली आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास पिण्याच्या पाण्याची टंचाई, तसेच जनावरांच्या चार्याची टंचाई भासणार आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात भातशेतीची दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.