

नंदकुमार सातुर्डेकर
पिंपरी : संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थ्यांना लाभासाठी 21 हजार वार्षिक उत्पन्नाची अट हास्यास्पद आहे. त्यात अन्य कागदपत्रांच्या मोठ्या दिव्यातून जावे लागते. ही सगळी कागदपत्रे पूर्ततेसाठी धडपड केल्यावर योजना मंजूर होते. मात्र, मंजुरीचे पत्र आमदारांच्या कार्यालयात जाऊन का घ्यावे लागते, असा प्रश्न पिंपरी विधानसभा मतदारसंघातील लाभधारकांना पडला आहे.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 65 वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षांवरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.
या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 900/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते. अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकतो.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे कार्यालय पूर्वी पुण्यात होते. पिंपरी-चिंचवडमधील दहा हजारांहून अधिक वंचित नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. या नागरिकांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पुण्यात हेलपाटे मारावे लागत होते. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सामाजिक विभागाकडे पाठपुरावा करून पिंपरी चिंचवडमध्ये संजय गांधी निराधार अनुदान स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार 28 सप्टेंबर 2020 रोजी आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा महिलांना लाभ मिळविण्यासाठी उत्पन्नाचा दाखला तसेच रहिवासी दाखला ही मिळवावा लागतो. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, घर मालकाचे एनओसी, दहा वर्षांपूर्वीचे त्या मालकाचे लाईट बिल, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला द्यावा लागतो.
विवाह नोंदणी दाखला, पतीचा अपघात झाला असेल, तर जिथे अपघात झाला तिथून लाभ घेतला नाही, याचा दाखला, पतीच्या मृत्यूचा दाखला, रहिवासी व उत्पन्न दाखला, ही सर्व कागदपत्रे संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेण्यासाठी जमा करावी लागतात. संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरून द्यावा लागतो, अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्ज मंजूर झाल्याचे पत्र लाभार्थ्यास घरी येणे अपेक्षित आहे.
मात्र, हा अधिकार पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी जणू स्वतःकडे घेतला आहे. आ. बनसोडे यांच्या कार्यालयातून योजनेचा आपला अर्ज मंजूर झाला आहे. मंजुरीचे पत्र घेऊन जा, असे असे फोन येतात. कारण नसताना आ. बनसोडे यांच्या कार्यालयात जाऊन मंजुरीचे पत्र घ्यावे लागते. आमदारांच्या या श्रेयवादाबद्दल लाभार्थी नापसंती व्यक्त करत आहेत.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तो अर्ज सबंधित कार्यालयात जमा केला. मात्र तुमचा योजनेत भरलेला अर्ज मंजूर झाला आहे. पत्र घेऊन जा, असा फोन पिंपरीच्या आमदारांच्या कार्यालयातून आला.
-एक विधवा महिला
संजय गांधी निराधार योजनेचे सर्टिफिकेट माझ्या कार्यालयातून दिले जाते.कारण अर्ज मंजुरीपर्यंत सर्व फॉलोअप आम्ही घेतो.जर एखाद्या व्यक्तीने स्वतंत्ररित्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न केले असतील तर ती लाभार्थी व्यक्ती अधिकार्यांकडून थेट पत्र घेऊ शकते.
-आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी मतदारसंघ
https://youtu.be/7KwsutS10qQ