

अर्जुन खोपडे
भोर : भोर तालुक्यातील हिरडस-मावळ खोर्याला राज्य शासनाने संवर्धन वन क्षेत्राचा दर्जा दिल्यामुळे या परिसरात पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे भोर उपविभागीय वनधिकारी आशा भोंग, वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात वन संवर्धन क्षेत्राबाबत बैठक घेण्यात आली. यामध्ये भोर तालुक्याचा वनविभागाचा काही भाग संवर्धन क्षेत्रात समावेश केला आहे. भविष्यात शासनाने याठिकाणी निधी उपलब्ध केल्यावर या परिसरात पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, गावातील नागरिकांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल.
हिरडस-मावळाचा पश्चिम घाट हा जैव विविधतेने नटलेला आहे. यामध्ये विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वृक्ष, वेली, कवके, सरपटणारे प्राणी-प्रजाती आहेत. हा भाग सलग व वृक्षाच्छादित असल्याने प्राण्यांच्या अधिवासांना जोडणारा भाग (उेीीळवेी) आहे. त्यामुळे क्षेत्राला राखीव संवर्धन क्षेत्र जाहीर केले आहे. या क्षेत्रामध्ये शिरगाव, उंबरडेवाडी, उंबर्डे, दुर्गाडी, कुडली बुद्रुक, कुडली खुर्द, गुढे, निवंगण, धानवडी, रायरी, दापकेघर, कारी, वडतुंबी, पर्हर बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे.
राखीव संवर्धन क्षेत्रामध्ये फक्त वनविभागाच्या ताब्यातील राखीव वने असून कोणत्याही मालकी क्षेत्राचा समावेश नाही. राखीव संवर्धन क्षेत्राचे क्षेत्रफळ 28.44 चौरस किलोमीटर आहे. भोर राखीव संवर्धन क्षेत्रामध्ये वनसंपदा, वन्य प्राण्यांचे संवर्धन याबरोबरच स्थानिक लोकांचे बळकटीकरण करणे, आर्थिक दृढता आणणे व पर्यटनाला चालना देणे इत्यादी गोष्टींचा समावेश होणार आहे.
पुणे-रायगड जिल्ह्याचा या वन संवर्धन क्षेत्रात काही भाग येत असून हा परिसर संपूर्ण हिरडस-मावळ खोर्यात येते. येथे निसर्ग सौंदर्य चांगल्याप्रकारे असल्यामुळे वन संवर्धन क्षेत्रात राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून पर्यटकांसाठी पर्यटनस्थळे तयार करुन नागरिकांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे.
– आमदार संग्राम थोपटे