

पुणे : पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असणारी एमएचटी-सीईटी ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीचा निकाल वेळेत जाहीर झाला असला तरी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्रसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) अभियांत्रिकी प्रवेशासाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) जुलैमध्ये होणार आहे. तर अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तुकला अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. या दोन्ही परीक्षा होऊन निकाल जाहीर झाल्यावर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. काही महाविद्यालयांनी सीबीएसई बोर्डाच्या निकालानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.