पाऊस नाही; फक्त महागाईच्या सरी; जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ

पाऊस नाही; फक्त महागाईच्या सरी; जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे : परदेशांतील जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीवरील हटलेले निर्बंध, युध्द परिस्थितीमुळे बंद झालेली निर्यात सुरू होऊन महागाईतून दिलासा मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे. मात्र, राज्यभरात मान्सूनच्या सरी अपेक्षेप्रमाणे बरसल्या नसल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, सरकारने महागाईतून दिलासा देण्यासाठी उपाययोजना केल्या असल्या, तरी त्या टिकणार किती, हा प्रश्नच आहे.

खाद्यतेल

सद्यस्थिती : इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध हटविले असून, युक्रेनसह युरोपीय देशांमधून सूर्यफूल बियांसह तेलाची निर्यात सुरू झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात घसरण झाली आहे. सध्या घाऊक बाजारात खाद्यतेल किलोमागे तीन ते पाच रुपयांनी उतरले आहे. किरकोळ विक्रेत्यांकडे अद्याप महागड्या दराने खरेदी केलेल्या तेलाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलांचे चढे दर टिकून आहेत. पुढील स्थिती : कोरोना, तसेच त्यानंतर आलेल्या विविध निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांत खाद्यतेलांच्या भावात सातत्याने वाढ झाली. रशिया-युक्रेन युध्दामुळे त्यात आणखी भर पडली. मात्र, सध्या परदेशात निर्यातीसंदर्भातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथील होत आहेत. येत्या काळात युध्दबंदी झाल्यास खाद्यतेलांचे दर मोठ्या प्रमाणात खाली येऊन पूर्वपदावर येतील.

डाळी

सद्यस्थिती : राज्यात लांबलेला पाऊस आणि केंद्र सरकारने एमएसपीत केलेल्या वाढीमुळे डाळींच्या दरात वाढ झाली आहे. याखेरीज यंदा मोठ्या प्रमाणात निर्यात झाली असून, मोठ्या कंपन्यांनी एसएसपीचा फायदा घेऊन कृत्रिम दरवाढ केली असल्याचे दिसून येते.
पुढील स्थिती : मान्सूनच्या परिस्थितीवर डाळींचे दर निश्चित होतील.

गहू

सद्यस्थिती :देशांतर्गत गव्हाचे उत्पादन कमी झाल्याने चालू हंगामात फेब—ुवारीपासून गव्हाच्या दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली. या दरम्यान केंद्र सरकारने निर्यातीदरम्यान बंदी आणल्याने ही वाढ शंभर रुपयांनी कमी झाली. त्यानंतर गव्हाचे दर अद्याप टिकून आहेत. पुढील स्थिती : पुढील हंगामापर्यंत गव्हाचे हेच दर टिकून राहतील. मात्र, सणासुदीच्या काळात आटा, मैदा, रवा यासाठी विविध कंपन्यांकडून गव्हाला मागणी राहील. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या मालापेक्षा मागणी जास्त राहून या काळात दरवाढ होण्याची शक्यता आहे.

कांदा

सद्यस्थिती : महिनाभरापूर्वी उन्हाळी नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांद्याच्या भावात घसरण झाली होती. त्यानंतर, शेतकर्‍यांनी कांदा साठवणुकीस प्राधान्य दिल्याने बाजारातील आवक घटली. परिणामी, घाऊकसह किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात वाढ होत आहे.पुढील स्थिती : योग्य प्रमाणात पाऊस झाल्यास सध्याचे कांद्याचे दर पुढील काळात कायम राहतील. मात्र, पावसाचा तडाखा बसून कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यास साठवणुकीतील कांद्याला मागणी वाढेल. राज्यासह परराज्यांतून मागणी वाढल्यास कांद्याच्या दरात वाढ होईल.

टोमॅटो

सद्यस्थिती : टोमॅटोला सातत्याने मिळणार्‍या कमी दरामुळे शेतकर्‍यांनी पिके उपटून टाकली. यादरम्यान पाण्याअभावी नवीन लागवडी न झाल्याने टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, टोमॅटोच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, पुण्यातील बाजारपेठेत टोमॅटोला मिळणार्‍या चांगल्या दरामुळे शेतकर्‍यांनी आपला मोर्चा पुण्याकडे वळविला. त्यामुळे टोमॅटोच्या भावात चढ-उतार सुरू आहे. पुढील स्थिती : टोमॅटोचे दर शंभर रुपये किलोपर्यंत गेल्याने शेतकर्‍यांनी पुन्हा लागवडी केल्या आहेत. मात्र, नवीन पीक येण्यास साडेतीन महिन्यांचा अवधी लागतो. त्यात मान्सून व मान्सूनपूर्व सरींनी दडी मारल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यानंतर उत्पादनात वाढ होऊन दरघटीची शक्यता आहे.

तांदूळ

सद्यस्थिती : यंदा देशभरात बासमती व बिगर बासमती तांदळाचे उत्पादन चांगले झाल्याने बासमती वगळता अन्य तांदळाचे दर स्थिर आहेत. बासमतीच्या निर्यातीत वाढ झाली असून, डॉलरचे दर वाढल्याने बासमतीच्या दरात वाढ झाली आहे.
पुढील स्थिती : येत्या काळात हेच दर कायम राहतील.

अशा कोसळताहेत महागाईच्या सरी
जून 2022 जून 2021 (दर प्रतिकिलो)
खाद्यतेल 175 ते 230 140 ते 180
डाळी 80 ते 100 — —
गहू 28 ते 55 24 ते 50
तांदूळ 35 ते 120 30 ते 100
टोमॅटो 60 ते 80 10 ते 20
कांदा 20 ते 25 25 ते 30
बटाटा 25 ते 30 15 ते 20

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news