हिंगोली : पावसाळा आला तरी ‘लाख’ची वाट अवघड | पुढारी

हिंगोली : पावसाळा आला तरी ‘लाख’ची वाट अवघड

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा ः लिंबाळा फाटा ते लाख या रस्त्याचे काम केवळ चार किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले.उर्वरित रस्त्याचे काम करण्यात न आल्याने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या भागातील प्रवाशांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. अनेक वाहने रस्त्यातील चिखलात फसत असल्याने वाहन चालकांची फजिती होत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुजीही न झाल्याने लाखकरांची वाट अवघड झाली आहे.

मागील पाच ते सहा वर्षांपासून लिंबाळा फाटा ते लाख या सात किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सातत्याने या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. आमदार संतोष बांगर यांनी चार किलोमीटरच्या डांबरीकरणाच्या रस्त्यास मंजुरी आणून ते काम पूर्ण केले. परंतु, उर्वरित तीन किलोमीटरचा रस्ता झाला नाही. त्यामुळे चार किलोमीटरचा डांबरी रस्ता होऊनही या रस्त्याचा उपयोग म्हणावा तसा होत नाही.

उर्वरित कच्या रस्त्यावर पाणी साचून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामध्ये शेतीमालाची वाहतूक करणारे वाहने फसत आहेत. सध्या बी-बियाण्यांसह खतांची ने-आण केली जात आहे. परंतु, रस्ता चिखलात रूतल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. किमान रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती करणे गरजेची बनली आहे. अन्यथा भर पावसाळ्यात हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होऊन लाख परिसरातील ग्रामस्थांना हिवरा मार्गे हिंगोलीला येण्यासाठी वीस किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे.

सोशल माध्यमातून होतोय रोष व्यक्‍त

लिंबाळा फाटा ते लाख रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. उर्वरित काम होण्याची आशा मावळल्याने लाख येथील ग्रामस्थांनी सोशल माध्यमातून आपला रोष व्यक्‍त केला आहे. फेसबुकवर लाख रस्त्याच्या दुरवस्थेचे फोटो टाकून प्रशासनासह लोकप्रतिनिधींना धारेवर धरत आपली नाराजी व्यक्‍त केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button