जातीनिहाय जनगणना करा; ओबीसी मेळाव्यात मागणी

जातीनिहाय जनगणना करा; ओबीसी मेळाव्यात मागणी
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: क्रिमिलेअरची अट रद्द करा, ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात सर्वच प्रमुख नेत्यांनी केली. राज्यस्तरीय ओबीसी मेळावा पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार हरिभाऊ राठोड व माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरुवातीला ओबीसी समाजातील देववाले, मरीआईवाले व इतर गोंधळी समाजाच्या वतीने गोंधळ घालून आणि मरीआईदेवीची गाणी गाऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जागर करण्यात आला. माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले, 'ओबीसी समाजाचे आरक्षण, जातानिहाय जनगणनेसह विविध प्रकारच्या मागण्या ओबीसी समाज वारंवार करीत आहे. परंतु, ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही.

त्यामुळे आता राज्यातील सर्व ओबीसी समाजाच्या जातींनी आणि घटकांना एकत्र येऊन मोठा लढा उभारावा लागेल. जातीय जनगणना करण्याचे मनावर घेतल्यास एका महिन्यात ती पूर्ण होऊ शकते. आज ओबीसी समाज एकत्र नसल्यामुळे कायम दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे भावी पिढीला उज्ज्वल भविष्य द्यायचे असेल, तर आता समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे.'

रुपनवर म्हणाले, 'ओबीसी समाजाचे भवितव्य खूप अंधारात आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवांनी आता याचा विचार केला पाहिजे. आता आपण अनुसूचित जातीतील समाजबांधवांना घेऊन चळवळीत सहभागी झाले पाहिजे आणि त्यांना आपल्या लढ्यात सहभागी करवून घेतले पाहिजे.'

या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. या मेळाव्यास संजय बालगुडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पी. बी. कुंभार, बाळासाहेब सानप, माजी नगरसेविका पुष्पा कनोजिया, राकेश खडके, प्रदेश उपाध्यक्षा किरण शिंदे, दीपक महामुनी आदी उपस्थित होते.

मेळाव्यात झाली या विषयांवर चर्चा

ओबीसी समाजाचे आरक्षण, जातीनिहाय जनगणना, क्रिमीलेअरची अट रद्द करावी, प्रमोशनमध्ये ओबीसी आरक्षण, मुलांना जिल्हा-तालुकानिहाय वसतिगृहेे निर्माण करावीत, ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी यांसारख्या अनेक प्रश्नांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनाचे व पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news