पंकजा मुंडेंची भाजपत घुसमट ; कार्यकर्त्यांची भावना | पुढारी

पंकजा मुंडेंची भाजपत घुसमट ; कार्यकर्त्यांची भावना

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री पंकजा मुंडे यांची भाजपत घुसमट होत असल्याची भावना कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. पाथर्डीत येवून मुंडे नेमके काय बोलणार आणि मुंडे यांच्या बोलण्याचा त्यांचे कार्यकर्ते काय अर्थ काढणार हे 21 जूनला समजेल. मुंडे पाथर्डीत त्यांच्या समर्थाकांशी सवांद साधणार आहेत.

त्यांच्या दौर्‍याची माहिती मिळताच शहरातील समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मोहटादेवी गडाच्या परिसरात मुंडे समर्थक फलक लावून त्यांच्या स्वागताची तयारी करत आहेत. मुंडे यांचाही परळीनंतर पाथर्डीकरावर चांगलाच जीव आहे. परळी आई, तर पाथर्डी मावशी, असे त्या नेहमीच सांगतात. त्यामुळे पाथर्डी या मावशीच्या गावी येऊन माजी मंत्री पंकजा मुंडे, काय राजकीय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे मंगळवारी (दि.21) पाथर्डी शहरात येणार असून, माजी मंत्री मुंडेंना भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीत डावलल्याने त्यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर गर्जे यांना भेटण्यासाठी त्या येणार आहेत. शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्या मोहटादेवीचे दर्शन घेणार असून, मुंडे यांच्या समर्थनार्थ केंद्रीय नेतृत्वाला दहा लाख ई-मेल व एक लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सांगली : हरिपुरात सहा कोटींचा गंडा; ७० जणांचा समावेश

ही मोहीम राज्यात मुंडेंचा व ओबीसी मतदारांचा प्रभाव असलेल्या 78 मतदारसंघांतून संयुक्तरित्या राबवली जाणार आहे. या मोहिमेेसाठी भगवानगडाच्या पायथ्याला असलेल्या पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष केकाण व त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणात पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात येत असल्याने अस्वस्थ मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे या ‘मास लिडर’ आहेत.

त्यांना जाणीवपूर्वक राज्य भाजपकडून अपमानीत केले जात असून, त्यामुळे त्यांच्यामागे उभी असलेली महाराष्ट्रातील ताकद राष्ट्रीय भाजपला दाखवण्यासाठी ‘पंकजाताई ..आमच्या आशा…आमचा वारसा,’ असे अभियान राबवून कार्यकर्त्यांची नाराजी व भावना भाजपतच राहून व्यक्त करण्याचा निर्धार घेतला आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाला दहा लाख ई-मेल व एक लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही मोहीम राज्यात मुंडेंचा व ओबीसी मतदारांचा प्रभाव असलेल्या 78 मतदारसंघातून संयुक्तरित्या राबवली जाणार आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडेंचे श्रध्दास्थान असलेल्या भगवान गडामुळे पाथर्डी तालुका राजकारण, समाजकारण, धर्मकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. पंकजा मुंडेंना समर्थन देण्यासाठी सुरू होणार्‍या ‘पंकजाताई …आमची आशा…आमचा वारसा,’ पंकजा नाही, तर भाजप नाही, अशी आमची भूमिका असल्याचे सुभाष केकाण यांनी सांगितले.

आमच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भाजप पक्षीयअंतर्गत पडद्या आडून राजकारणातून बाजूला करण्याचा डाव सुरू आहे. तो डाव आम्ही कार्यकर्ते हाणून पाडू. मुंडे यांच्याबरोबर आम्ही आहोत. 78 मतदारसंघांत ही आमचा वारसा ही मोहीम प्रभावी राबवून केंद्रीय नेवृत्वाच्या निदर्शनास आणून देऊ.
– सुभाष केकाण, कार्यकर्ते, पाथर्डी.

पंकजा मुंडे या मास लिडर असून, त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची मोठी क्षमता आहे. त्यांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल, कोणी पक्षातूनच कुरघोड्यांचे राजकारण करीत असेल, तर आम्ही ते मुंडे समर्थक म्हणून सहन करणार नाही.
– गोकूळ दौंड, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप.

एक लाख पोस्ट कार्ड पाठविणार
विधान परिषद निवडणुकीत ‘मास लिडर’ असलेल्या पंकजा मुंडे यांना डावलून एक वर्ष फडणवीसांचे स्वीयसहायक असलेल्या श्रीकांत भारती व ओबीसीचा चेहरा बनू इच्छीत असलेल्या राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात येवून पंकजा मुंडे समर्थकांची अडचण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. स्व. मुंडे यांचे कार्यकर्ते असलेल्यांना पंकजा मुंडे यांना विश्वासात न घेता केंद्रात मंत्रिपद देवून पंकजा यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माजी मुख्यामंत्री फडणवीसांना मुंडे डोईजड होत चालल्याने त्यांचे खच्चीकरण केले जात असल्याने ओबीसींना आज राज्यात नेता राहिला नाही. राज्यात मुंडे यांची ताकद दाखवण्यासाठी आता सोशल मीडियाचा आधार घेत केंद्रीय नेत्यांना ‘आम्ही नाराज आहोत…आमचे गाव…तालुका नाराज आहे., महाराष्ट्र भाजप नाराज आहे…पंकजाताईंना न्याय द्या…,’ अशा आशयाचे दहा लाख ई-मेल, तर एक लाख पोस्ट कार्ड पाठविले जाणार आहेत.

 

 

Back to top button