भाजपच्या नव्या टेक्निकने दगाफटका कुणाला? | पुढारी

भाजपच्या नव्या टेक्निकने दगाफटका कुणाला?

मुंबई : सुरेश पवार
राज्यसभेतील सहा जागांच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धिचातुर्याने शिवसेना उमेदवाराचा पराभव करून भाजप उमेदवार विजयी केला. क्रमदेय मतपद्धती अर्थात प्रेफरेन्शियल व्होट पद्धतीत अचूक गणिताचे टेक्निक वापरून त्यांनी हा अनपेक्षित विजय मिळवला. त्याचवेळी महाविकास आघाडीची तब्बल दहा मतेही भाजपच्या पारड्यात पडली होती. आता विधान परिषदेच्या दहा जागांच्या लढतीसाठी भाजपने आणखी वेगळ्या आणि नव्या टेक्निकचा वापर करण्याचे ठरवले असून, नवे टेक्निक पूर्वीपेक्षा वेगळे असेल आणि ते हमखास यशस्वी होईल, असा दावाही भाजप नेते करीत आहेत. भाजपच्या या नव्या टेक्निकची जोरदार चर्चा सुरू असून या नव्या अस्त्राने कोणास दगाफटका होणार, अशीही कुजबुज सुरू झाली आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे सध्या कारागृहात आहेत. न्यायालयाने त्यांना या मतदानात भाग घेता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ 51 वर आले आहे, तर विजयी होण्यासाठीचा कोटा 27 वरून 26 वर आला आहे.

भाजपला हवीत सात मते

भाजपचे 106 आमदार आहेत आणि मनसे या एका पक्षासह सहा अपक्षांनी म्हणजे एकूण सात आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. म्हणजे भाजपचे संख्याबळ 113 एवढे आहे. पण राज्यसभेवेळी भाजपला पहिल्या पसंतीची 123 मते पडली होती, हे लक्षात घेतले पाहिजे. भाजपला 26 मतांच्या कोट्यानुसार पाच उमेदवार विजयी करण्यासाठी 130 मतांची जुळणी करावी लागते. राज्यसभेवेळी प्राप्त झालेली 123 मते लक्षात घेतली, तर भाजपला पाचवा उमेदवार विजयी करण्यासाठी केवळ सात मतांची आवश्यकता आहे. एवढी सात मते खेचून आणण्यासाठी भाजप नेते जीवाचे रान करतील, यात शंका नाही.

क्रॉस व्होटिंगची चर्चा

राज्यसभेवेळी महाविकास आघाडीतील मते फुटली, ही वस्तुस्थितीच असल्याने भाजप आपल्या नव्या टेक्निकसह महाविकास आघाडीला आणखी खिंडार पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सद्सद्विवेकबुद्धीचे आवाहन केले आहेच. त्यातूनही आघाडीतील पक्षातून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यताही चर्चेत आहे. तसे खरोखर घडले, तर मात्र महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता बोलली जात आहे.

  • विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा अटीतटीची आणि कमालीच्या ईर्ष्येने लढत होणार आहे. दोन्ही बाजूंनी जबरदस्त मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. भेटीगाठीचे सत्र अहोरात्र सुरू आहे. अर्थपूर्ण चर्चा आणि खलबते होत आहेत. त्याबरोबर भाजप काही नवीन टेक्निक वापरणार, अशी जोरदार हवाही तयार झाली आहे. भाजपने हे टेक्निक गोपनीय राखले आहे. मतदानातील हे नवे टेक्निक आहे, की राजकीय मुत्सद्देगिरीचे, याचे उत्तर निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Back to top button