मंचर : पुढारी वृत्तसेवा: नागरिकांनी पोलिस दलाशी समन्वय ठेवून गुन्हेगारी प्रवृतीचा बीमोड करण्यासाठी पुढे यावे. त्या माध्यमातून गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी पोलिस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी केले. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथे पूर्व भागातील 22 गावांसाठी नवीन पोलिस ठाण्याची सुरुवात करण्यात आली. त्याचे उद्घाटन हभप खंडू महाराज दातखिळे, हभप विठ्ठल महाराज पाबळे, ज्येष्ठ व्यापारी रायचंद्र गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे, ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजने, शरद सहकारी बँकेचे संचालक दौलतभाई लोखंडे, आंबेगाव तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर दाभाडे, सचिन देवडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील म्हणाले की, सध्या वारीसाठी पोलिस बंदोबस्तास गेले असल्याने कमी मनुष्यबळ आहे.
या ठिकाणी एक पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक, तसेच पन्नास कर्मचारी अशी पदे असणार आहेत. परिसरातील पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समिती पदाधिकारी यांनी पोलिसांना सहकार्य करून चांगल्या पद्धतीने काम करावे. पारगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे, शरद बँकेचे संचालक दौलतभाई लोखंडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा