टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकर्यांचे डोळे आकाशाकडे लागली होते. मात्र, दि.23 च्या मध्यरात्री व 24 रोजी दुपारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून खरीप पेरणीला आता वेग येणार आहे.
टाकळीभानसह परिसरात गुरुवारी रात्री सुमारे 1 वाजेच्या दरम्यान जोरदार पावसास सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी व दुपारी कमी जास्त प्रमाणात हा पाऊस सुरू होता. टाकळीभानसह परिसरात दमदार पावसास सुरुवात झाली आहे.
पावसाळा सुरू होऊन जवळपास महिना होत आला होता.
मात्र, पाऊस पडण्याचे चिन्ह नव्हते. मागील काही वर्षांत रोहिणी, तसेच बिगरमोसमी पाऊस होत असे. मात्र, यावर्षी रोहिणी नक्षत्रांसह बिगरमोसमी पाऊस झालाच नाही. परिणामी खरिपाच्या मशागतीचे कामे खोळंबली गेली. मृग नक्षत्राचा पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला असताना थोडासा अपवाद वगळता फारसा पाऊस मृग नक्षत्रात पडलाच नाही व मृग नक्षत्रही कोरडेच गेले. दि. 23 च्या रात्री व दुपारी 4.30 वाजण्याच्या दरम्यान आर्द्रा नक्षत्रातील पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावली असून, पेरणीची लगबग आता सुरू होणार आहे.
त्यामुळे कृषी सेवा केंद्रात गर्दी दिसू लागली आहे. खते व बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्यांची पैशांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. अद्याप काही ठिकाणी अद्यापही पेरणीलायक पाऊस पडला नसल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ओल कमी असल्याने पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट येऊ शकते, या कारणामुळे अद्यापही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.