मंचर : पुढारी वृत्तसेवा: नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या मंचर नगरपंचायत मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये मतदारांच्या नावांचा सावळागोंधळ झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मतदार हवालदिल झाले आहेत. मतदार यादीतून मृत मतदारांची नावे वगळलेली नाहीत. प्रभागरचनेनुसार मतदारांची नावे यादीमध्ये प्रविष्ट केलेली नाहीत. मंचर नगरपंचायत प्रभाग क्रमांक 9 ची अंतिम रचना निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली तेव्हा एकूण मतदार संख्या 1279 जाहीर करण्यात आली. परंतु दिनांक 21 जून 2022 रोजी मूळ प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये मतदारांची संख्या 1578 आहे.
फक्त पंधरा दिवसाच्या फरकाने प्रसिद्ध झालेल्या या दोन्ही याद्यांमध्ये तीनशे मतदारांची नावे अचानक कुठून आली असा प्रश्न निर्माण होतो आहे. यासंदर्भात काही मतदारांनी हरकत अर्ज निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत.प्रभाग क्रमांक 2, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 मध्ये लोकसंख्या व मतदार संख्या यात तफावत आहे. काही प्रभागांमध्ये ज्या व्यक्ती राहत नाहीत त्यांची नावे आलेली आहेत. बरेच परप्रांतीय मतदार स्थलांतरित झाले असून ते कोणत्या प्रभागामध्ये आहेत हा इच्छुकांना व राजकीय पक्षांना प्रश्न पडला आहे. बरेच मतदार मंचर नगरपंचायत कार्यक्षेत्राबाहेर तालुक्यात तसेच जिल्ह्यात मूळ गावी राहत आहेत त्यांची नावे यादीत आहेत.
मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप मंचर शहर भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा जागृती किरण महाजन यांनी केला आहे. मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मृत व्यक्तींची नावे आहेत. प्रभाग 12 मध्ये मंचर बस स्टँड तसेच लक्ष्मी रोड, मोरडेवाडी येथील मतदारांची नावे आहेत.मंचर नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज पष्टे यांना नागरिक व विविध पक्षांच्या पदाधिकार्यांनी भेटून आक्षेप घेतला आहे. तहसीलदारांनी याकडे लक्ष द्यावे. लवकरात लवकर सुधारित यादी तयार करावी, अशी मागणी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुशांत थोरात यांनी केली आहे.
नागरिकांनी मतदार यादीवरील हरकती आणि सूचना पुराव्यानिशी मंचर नगरपंचायतीत सोमवार (दि.27) पर्यंत सादर करावीत. त्यानंतर नगरपंचायतीचे पथक संबंधित व्यक्तीचा पत्ता आणि नाव याची शहानिशा करून वरिष्ठांना अहवाल पाठवून कार्यवाही केली जाईल.
-मनोज पष्टे, मुख्याधिकारी