बारामती : पुढारी वृत्तसेवा
अनेकदा बँकेतून क्रेडिट कार्ड घ्या, असा कॉल येतो. सहज क्रेडिट कार्ड मिळते म्हणून अनेक जण ते स्वीकारतात. खरेतर क्रेडिट कार्ड सहज कुणालाही उपलब्ध होत आहे. क्रेडिट कार्ड वापरताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाते, ज्याबद्दल बँक किंवा बँकेचे प्रतिनिधी माहिती सांगत नाहीत. क्रेडिट कार्डवर जे चार्जेस असतात, त्याबाबत ग्राहकांनी माहिती घेणे गरजेचे आहे.
बँक ग्राहकांकडून शुल्क वसूल करते. यामध्ये वार्षिक शुल्क बँकांनुसार बदलते. मात्र, काही बँका हे शुल्क आकारत नाहीत, तर काही बँका ग्राहकांसमोर दरवर्षी ठरावीक रकमेची खरेदी करायचे बंधन टाकतात. काही बँका बिल कार्डसोबत जोडण्यासाठी वार्षिक शुल्कसाठी काही ऑफरदेखील देतात.
ग्राहकांना किमान रक्कम भरल्यास व्याज आकारले जाणार नाही, असे वाटते. किमान रक्कम जमा केल्याने दंडापासून वाचता येते. यावर 40 ते 42 टक्के मोठे व्याज द्यावे लागेल, हे अनेकांना माहिती नाही. गरजेला काही ग्राहक क्रेडिट कार्डमधून पैसे काढतात, असे अनेकदा दिसून येते. पैसे काढल्याबरोबर बँक शुल्क आकारण्यास सुरुवात करते, हे फार कमी जणांना माहीत आहे. कार्डवर शॉपिंगची सुविधा मिळते. पण, जर रोख रक्कम काढली तर त्या बदल्यात चार्ज भरावे लागेल. अनेकदा बँक कार्ड जारी करण्यापूर्वी याचा खुलासा करीत नाही.
सर्व बँका क्रेडिट कार्डने पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी अधिभार आकारतात. अनेकदा हे शुल्क रिफंड मिळते. रिफंडसाठी एक निश्चित मर्यादा आहे. त्यापेक्षा जास्त इंधन कुणी भरल्यास शुल्क परत मिळत नाही. कार्डच्या साह्याने परदेशात व्यवहार करू शकता, असे बँकर्स सांगतात. पण, ते किती चार्ज आकारणार हे सांगता येत नाही. कार्डने परदेशात व्यवहार करीत असाल, तर त्यासाठी शुल्क भरावे लागते.
हेही वाचा