दिवे : पुढारी वृत्तसेवा
दिवे परिसरात फळबागांची लागवड जास्त आहे. परंतु, उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत असल्याने शेतकर्यांचा शेततळ्याकडे कल वाढला आहे. पावसाळ्यात या शेततळ्यात पाणी साठवून पाण्याची कमतरता भासेल तेव्हा ते पाणी वापरले जाते.
परिसरातील काही शेतकर्यांनी या शेततळ्यात मत्स्यसंवर्धन केल्याने दुहेरी फायदा झाला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी शेततळ्यात मत्स्यबीज सोडून त्याची पूर्ण वाढ झाल्यावर विक्री करायची, तर काही शेतकर्यांनी आपली शेततळी मत्स्य व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देत चार पैसे मिळवत आहेत.
गोकूळ झेंडे, शुभम झेंडे यांनी आपली शेततळी भाडेतत्त्वावर दिली आहेत. शुभम झेंडे यांनी प्रसाद निंबाळकर यांना आपले शेततळे भाडेतत्त्वावर दिले, तर काही ठिकाणी व्यापारी जागेवर येऊन मत्स्य खरेदी करतात. एकंदरीत, यामुळे दिवे परिसरात मत्स्यव्यवसाय हळूहळू वाढत आहे.