सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : टोलचे पैसे देण्याच्या कारणावरून, नांदणी नाक्यावर एसआपीएफ पोलिसासह 6 जणांनी तलवारी नाचवत राडा केला. यावेळी झालेल्या मारहाणीत 3 कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी मंद्रुप पोलिस ठाण्यात 6 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला. तर पोलिसांनी एसआरपीएफ पोलिसासह चौघांना अटक केली. या चौघांना कोर्टापुढे उभे केले असता न्यायाधीशांनी चौघांना पोलिस कोठडी सुनावली.
रोहन सुरेश जाधव (वय 30), गजानन आण्णाराव कोळी (वय 29) दोघे (रा. सैफुल, विजापूर रोड), सुरज बबनराव शिखरे (वय 31), शिवशंकर बबनराव शिखरे (वय 25) दोघे (रा. राज्य राखीव पोलिस बल गट क्रं.10) व दोन अज्ञात अशा 6 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन थेटे यांनी दिली.
या प्रकरणी टोलनाक्यावरील शिफ्ट इंचार्ज नागेश भिमाशंकर स्वामी (वय 28 रा. नांदणी ता.दक्षिण सोलापूर) यांनी मंद्रुप पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, वरील 6 जण 2 जून रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास विजापूर ते सोलापूर जाणार्या राष्ट्रिय महामार्गावरील नांदणी टोलनाक्यावर एमएच12/एक्यू 4455 या क्रमांकाची कार सोलापूरकडे जाताना थांबली. त्यावेळी टोलनाक्यावरील कर्मचार्यांनी गाडीतील चालकास टोलची रक्कम भरण्याची विचारणा केली. त्यावेळी कारमधील एकजण खाली उतरून शिवीगाळ करून कर्मचार्यांना दमदाटी करू लागला.
गाडीतील इतर 5 जण खाली उतरले. शिफ्ट इंचार्ज नागेश स्वामी याला मारहाण करू लागले. टोलनाक्यावरील इतर कर्मचारी भांडण सोडविण्यासाठी आल्यानंतर एकाने कारमधील तलवार बाहेर काढली. व तलवारीचा धाक दाखवून महांतेश सोनकंटले यांच्या छातीत मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. कंट्रोल रूमच्या काचेवर दगडफेक केली. बायोमेट्रिक मशिन फोडून 25 हजारांचे नुकसान केले. या फिर्यादी वरून एसआरपीएफच्या पोलिसासह 6 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास फौजदार करपे करीत आहेत.