हार्दिक पंड्या : भावी नेतृत्वाची पायाभरणी | पुढारी

हार्दिक पंड्या : भावी नेतृत्वाची पायाभरणी

भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स संघाला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिले. हार्दिकने फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करीत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले.
अल्पकाळात आपल्या जीवनासाठी आर्थिक तरतूद करणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवीत अनेक युवा खेळाडू आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत असतात. तरीही ही स्पर्धा म्हणजे अनेक युवा खेळाडूंसाठी राष्ट्रीय संघांचे दार ठोठावण्याची उत्तम संधी म्हटली जाते.

यंदाची आयपीएल स्पर्धा भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांचे नेतृत्वपद निश्चित करण्यासाठी असलेले हुकमी व्यासपीठच होते. हार्दिक पंड्या याच्यासह तीन-चार खेळाडूंकडे त्याच द़ृष्टिकोनातून पाहण्यात आले होते. राष्ट्रीय संघ ठरविण्यासाठी पूर्वी ‘रणजी’, ‘दुलीप करंडक’, ‘देवधर करंडक’, ‘इराणी चषक’ इत्यादी स्पर्धांमधील कामगिरीचा प्राधान्याने विचार केला जात असे. जागतिक स्तरावरील सततचे दौरे आणि आयपीएलसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमुळे या स्थानिक सामन्यांना दुय्यम महत्त्व प्राप्त झाले. केवळ भारतीय खेळाडू नव्हे, तर परदेशातीलही अनेक खेळाडू आयपीएल स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व देत असतात.

आपल्या एक-दोन पिढ्यांची आर्थिक बेगमी करण्यासाठी आयपीएल स्पर्धेसारखे दुसरे कोणतेही चलनी नाणे नसते, असा विचार करीत परदेशी खेळाडूदेखील आयपीएलवर अधिक लक्ष केंद्रित करीत असतात. भारतीय खेळाडूदेखील एकवेळ आपल्या राज्याच्या संघाकडून खेळता नाही आले तरी चालेल; परंतु आयपीएलमध्ये आपली वर्णी कशी लागेल, याचाच विचार करीत असतात. लागोपाठच्या दौर्‍यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा या भारतीय संघाच्या कर्णधारांच्या कामगिरीत अनेक चढउतार दिसून येऊ लागले आहेत. साहजिकच, भारतीय कसोटी संघाप्रमाणेच मर्यादित षटकांच्या संघांचे नेतृत्व खंबीरपणे सांभाळण्याच्या द़ृष्टीने योग्य पर्यायांच्या शोधासाठी भारतीय निवड समिती प्रयत्न करीत आहे.

अजिंक्य राहणे, के. एल. राहुल इत्यादी काही पर्यायांचीही चाचपणी केली जात आहे. संघांच्या नेतृत्वासाठी शोधमोहीम करण्याची हुकमी जागा म्हणजे आयपीएल स्पर्धा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवीत राष्ट्रीय निवड समितीने वेगवेगळ्या पर्यायांचा गांभीर्याने विचार केला आहे. आयपीएलमधील बहुतेक संघांचे कर्णधारपद भारतीय खेळाडूंकडे देण्यात आले होते. त्यामागचा हादेखील एक हेतू होता. भारताच्या कर्णधारपदासाठी असलेल्या संभाव्य शिलेदारांपैकी हार्दिक पंड्या याने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी कामगिरी केली आहे. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर त्याने या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्स संघाला सनसनाटी विजेतेपद मिळवून दिले.

हार्दिक याने वैयक्तिकरित्याही फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करीत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. गतवेळी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याची कामगिरी अतिशय खराब झाली होती. त्यामुळे त्याला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर मोठ्या दुखापतीसही त्याला सामोरे जावे लागले होते. त्याचे बिनधास्त वागणे, महागड्या वस्तूंचे आकर्षण, शंका यावी अशी शारीरिक तंदुरुस्ती इत्यादी अनेक कारणास्तव त्याच्यावर सातत्याने टीका करण्यात आली होती. त्यामुळेच की काय, जेव्हा त्याच्याकडे गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व देण्यात आले त्यावेळीदेखील अनेकांनी त्यांच्या या निर्णयावर टीका केली होती.
लोकांनी कितीही टीका केली तरी, आपण मात्र अतिशय संयमाने आणि स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर या टीकाकारांना उत्तर द्यायचे, हेच ध्येय हार्दिक याने डोळ्यासमोर ठेवले होते.

महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली इत्यादी दिग्गज खेळाडूंबरोबर खेळल्यामुळे त्यांच्याकडून त्याला बरेच काही शिकावयास मिळाले आहे. एवढेच नव्हे, तर आयपीएलमध्ये सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतानाही त्याच्यातील क्रिकेट कौशल्यांची व्यवस्थित रितीने बांधणी झाली आहे. मुंबईकडूनच त्याची जडणघडण झाली आहे, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. हार्दिकने गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व म्हणजे आपल्या करिअरमधील सर्वोच्च कसोटीचा क्षण आहे, असे विचार ठेवीत सातत्यपूर्ण कामगिरी केली. संघातील सहकारी ज्येष्ठ असो वा कनिष्ठ असो. तो सर्वोत्तमच खेळाडू आहे, असे मानून त्याच्याकडून संघासाठी चांगली कामगिरी कशी करून घेता येईल याचाच विचार हार्दिक याने केला. फलंदाजी, गोलंदाजी क्षेत्ररक्षण या सर्व आघाड्यांवर आपल्या सहकारी खेळाडूंचे गुणदोष बारकाईने हेरून त्याप्रमाणे त्यांच्याकडून ईप्सित कामगिरी कशी करून घेता येईल, असाच त्याने विचार केला. गुजरातला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणूनच अनेक ज्येष्ठ क्रिकेट समीक्षकांनी त्याचे गुणगान केले आहे.

यष्टीरक्षक संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. त्याने संघातील अनुभवी खेळाडूंकडून प्रभावी व सातत्यपूर्ण कामगिरी करून घेतली. अंतिम फेरीत त्याचे आडाखे आणि नियोजन अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नाहीत. मात्र एक कुशल कर्णधार म्हणून त्याचे कौशल्य स्मरणात राहील, असेच ठरले आहे. वैयक्तिकरित्याही त्याने सातत्यपूर्ण फलंदाजी केली. यष्टीरक्षक हा सर्वोत्तम कर्णधार असू शकतो, असे नेहमी म्हटले जाते कारण त्याला प्रतिस्पर्धी फलंदाज कसा खेळतो आणि आपले सहकारी गोलंदाज कसे चेंडू टाकतात, याचा बारकाईने अभ्यास असतो. सॅमसनच्या संघाला विजेतेपद मिळविता आले नाही तरीही अन्य मातब्बर संघांना मागे टाकून अंतिम फेरीपर्यंतची त्यांची मजल ही खूपच बोलकी कामगिरी आहे. तरीही भारतीय संघाचा कर्णधार होण्यापूर्वी स्वतःला हा या संघात कसे स्थान मिळवता येईल, याचाच त्याने प्राधान्याने विचार करायला पाहिजे.

कर्नाटकचा अनुभवी खेळाडू के. एल. राहुल याने भारतीय संघाचा कर्णधार म्हणून काही वेळेला समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे. ही जबाबदारी सांभाळताना त्याने परिपूर्ण व मातब्बर सलामीवीर म्हणूनही नावलौकिक मिळविला आहे. केवळ मर्यादित षटकांच्या नव्हे, तर कसोटी संघासाठीही तो भारताचा हुकमी एक्का मानला जातो. भारतीय संघाचे नेतृत्व तो करीत आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो अव्वल दर्जाचा खेळाडू मानला जातो. नेतृत्वपदासाठी पंजाब किंग्जचा मयांक अगरवाल, कोलकाता नाइट रायडर्सचा श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत यांच्याबाबतही चर्चा आहे. मात्र हे सर्वच खेळाडू स्वतःच्या वैयक्तिक कामगिरीबरोबरच सांघिक कौशल्यामध्येही अपयशी ठरले आहेत.

काही खेळाडू अक्षम्य चुकीमुळे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात. ऋषभ याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंचांशी अरेरावी करीत अतिशय बेशिस्त वर्तन केले. या सामन्याचे मिळणारे मानधन त्याला संयोजन समितीकडे दंड म्हणून भरावे लागले, पण त्याचबरोबर त्याला प्रसारमाध्यमांची कडवट टीकाही सहन करावी लागली. या सामन्यानंतर ऋषभ याने आपल्या संघास काही सामने जिंकून दिले; मात्र ‘बुँद से गयी व हौद से नही आती’ याप्रमाणेच गेलेली शान त्याला भरून काढता आलेली नाही. श्रेयस व मयांक यांना त्यांच्या संघातील खेळाडूंचा समवेत अपेक्षेइतका सुसंवाद ठेवता आला नाही. एकूणच, आयपीएल स्पर्धेतील विविध भारतीय कर्णधारांची कामगिरी लक्षात घेतली तर ‘हार्दिक पंड्या’ हाच भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा वारसदार मानला जात आहे. अर्थात धोनी, रोहित शर्मा इत्यादी कर्णधारांची गादी पुढे चालवावयाची असेल तर हार्दिक पंड्या याला स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण ठेवण्याची, तसेच मैदानावर आणि मैदानाबाहेरही संयमाने वागण्याची गरज आहे.

– मिलिंद ढमढेरे

Back to top button