अजिंक्यपद स्पर्धा : अहमदनगरच्या दोन्ही संघांची विजयी सलामी
अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : राज्यस्तरीय स्पर्धेचा प्रारंभ जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या हस्ते पर्यावरणाचा संदेश देत तुळशीच्या रोपाला पाणी टाकून आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आला. आंतर जिल्हा स्पर्धेत नगरच्या मुलींच्या संघाने विजयी सलामी दिली. नगरने सोलापूरला 2-1, तर मुलांच्या संघाने कोल्हापूरचा 2-0ने नमवत विजयी सलामी दिली. आजपासून अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. नगरमध्ये अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन,योनेक्स सनराईज व स्व.शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल राज्यस्तरीय 15 व 17 वर्षाखालील आंतरजिल्हा व राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजिली आहे.
या स्पर्धा 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान वाडिया पार्कच्या क्रीडा संकुलात होणार आहेत. यावेळी बॅडमिंटन जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अशोक कोठारी, उपाध्यक्ष उद्योजक नरेंद्र फिरोदिया, सचिव मिलिंद कुलकर्णी, महाराष्ट्र बॅडमिंटन असो.चे पदाधिकारी मनोज कन्हेरे, प्रसाद गोखले, ज्युवेल चांदेकर, राष्ट्रीय कोच विशाल गर्जे, मॅचचे प्रमुख पंच मिलिंद देशमुख, उपपंच विश्वास देसवंडीकर, मॅच कंट्रोलर सचिन भारती, अशोक सोनी मंडलेचा, राहुल मोटे, डॉ. भूषण अनभुले आदी उपस्थित होते.
राज्यातील 32 मुलांचे, तर 25 मुलींच्या संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, स्पर्धेसाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असो.चे सहकार्य लाभले आहे. स्व. शांतीकुमार फिरोदिया ट्रस्टचे सहकार्य होत असल्याचे आभार व्यक्त करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना साडेतीन लाखांची रोख बक्षिसे व ट्रॉफी देवून गौरविण्यात येणार आहे.
सांघिक भावना अन् चपळता निर्माण होते : सुनील गोसावी
जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे अतिशय चांगले आयोजन केल्याबद्धल जिल्हा बॅडमिंटनचे अभिनंदन केले. कोणत्याही स्पर्धेत जिंकण्यासाठी मनापासून घेतलेली मेहनत त्यातूनच खेळाडूंमध्ये अचूकता, चपळता प्राप्त होते, खेळाडूंनी सांघिक भावना जपली पाहिजे.
आंतरजिल्हा स्पर्धेचा निकाल
मुली : छ. संभाजीनगर विवि अमरावती (2-0), सातारा विवि यवतमाळ (2-1), पुणे-1 विवि हिंगोली (2-0), रायगड-1 विवि कोल्हापूर (2-0), पालघर विवि सांगली (2-1), नागपूर विवि वर्धा (2-0), नाशिक विवि जळगाव (2-0), ठाणे विवि बुलढाणा (2-0), पुणे विवि संभाजीनगर (2-0), नगर विवि सातारा (2-1), ग्रेटर मुंबई विवि रत्नागिरी (2-0), पुणे-1 विवि सांगली (2-0), रायगड विवि भंडारा (2-1), मुले : सांगली विवि वाशिम (2-1), रायगड विवि नांदेड (2-0), भंडारा विवि अमरावती (2-0), धाराशिव विवि यवतमाळ (2-0), जळगाव विवि चंद्रपूर (2-0), परभणी विवि धुळे (2-0), गोंदिया विवि सिंधुदूर्ग (2-0), सातारा विवि ग्रेटर मुंबई (2-1), परभणी विवि बीड (2-0),नागपूर विवि सोलापूर (2-0),छ.संभाजीनगर विवि लातूर (2-1), नाशिक विवि वर्धा (2-0), रत्नागिरी विवि बुलढाणा (2-0), ठाणे-2 विवि गडचिरोली (2-0), धाराशिव विवि जळगाव (2-0), पालघर विवि गोंदिया (2-0), नागपूर विवि परभणी (2-0), ठाणे-2 विवि रत्नागिरी (2-0).
शांतीकुमार यांना यातून आदरांजली : नरेंद्र फिरोदिया
उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले, स्पर्धेनिमित्त राज्यभरातील एक हजार बॅडमिंटनपटू नगरला आले आहेत. स्पर्धा सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान रंगणार आहेत. 932 सामने होणार असून, एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी गटात सामने होतील. स्व. शांतीकुमार यांना स्पर्धा आयोजनातून आदरांजली आम्ही वाहत असून, उदयोन्मुख खेळाडूंना नेहमी फिरोदिया ट्रस्टच्या माध्यमातून सहकार्य असते, असे फिरोदिया म्हणाले.
हेही वाचा

