

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सध्या कार्यरत असलेल्या 85 कर्मचार्यांवरच महापालिका अग्निशामक दलाचा भार आहे. एकूण 8 केंद्रांच्या तुलनेत ही संख्या खूपच नगण्य आहे. दरम्यान, कंत्राटी तत्त्वावर 100 कर्मचारी घेण्यात आले असून त्यांची मदत या कामासाठी होत आहे. मात्र, प्रत्यक्षात अग्निशामक दलात एकूण 360 रिक्त पदे आहेत.
अग्निशामक दलामध्ये एकूण 445 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या 85 पदे भरलेली आहेत. तर, 360 पदे रिक्त आहेत. अग्निशामक दलामध्ये सध्या आस्थापनेवर 2 उप अग्निशमन अधिकारी, 24 लिडिंग फायरमन, 38 फायरमन, जुन्या मंजूर आकृतीबंधानुसार 21 वाहनचालक अशी पदे भरलेली आहेत.
रिक्त पदांमध्ये 1 मुख्य अग्निशमन अधिकारी, 1 उप मुख्य अग्निशमन अधिकारी, 2 विभागीय अग्निशमन अधिकारी, 2 सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, 12 अग्निशमन केंद्र अधिकारी, 22 उप अग्निशमन अधिकारी, 60 चालक तथा यंत्रचालक, 16 लिडिंग फायरमन, 235 फायरमन आणि जुन्या मंजूर आकृतिबंधानुसार 9 वाहनचालक आदी पदे रिक्त आहेत. दरम्यान, कंत्राटी तत्त्वावर सध्या 100 कर्मचारी घेण्यात आले आहेत.
शहराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. सध्या ही लोकसंख्या 27 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्येची वाढती घनता लक्षात घेता महापालिका अग्निशामक दलाला केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यासाठी आवश्यक कर्मचारी संख्या भरावी लागणार आहे. सध्या असलेल्या तुटपुंज्या कर्मचारी संख्येमुळे सध्या कार्यरत कर्मचार्यांवरच कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
हेही वाचा