व्यावसायिकाच्या खुनाचा हॉटेल कामगारांकडून प्रयत्न | पुढारी

व्यावसायिकाच्या खुनाचा हॉटेल कामगारांकडून प्रयत्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  उपाहारगृहात मैत्रिणीसोबत जेवण करण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाचा बिलावरून वाद झाल्याने त्याला कामगारांनी बेदम मारहाण केल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह कामगाराला अटक करण्यात आली.
मॅनेजर प्रशांत जम्मेकर सामल (वय 38, रा. घुले वस्ती, उंड्री), कामगार मौसम कमानसिंग कुंवर (वय 27, रा. होले वस्ती, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर हॉटेलमधील दोन ते तीन कामगारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हुजेफा मुस्तफा अत्तारवाला (वय 38, रा. गंगा फ्लोरन्टिना, एनआयबीएम रस्ता) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्तारवाला व्यावसायिक आहेत. अत्तारवाला आणि त्यांची डॉक्टर मैत्रीण एनआयबीएम रस्त्यावरील स्पाईस फॅक्टरी हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर आकारण्यात आलेल्या बिलाबाबत अत्तारवाला यांनी कामगाराकडे विचारणा केली. या कारणावरून हॉटेलमधील मॅनेजर सामल याने अत्तारवाला यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. संपूर्ण बिल भरल्याशिवाय उपाहारगृहातून बाहेर पडू देणार नाही, असे सामलने त्यांना सांगितले. त्यानंतर सामल, कामगार कुंवर आणि साथीदारांनी अत्तारवाला यांच्या डोक्यात बाटली फोडली. अत्तारवाला यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक विजय वगरे तपास करत आहेत.

हेही वाचा : 

पुणे : कसब्यात मानवी मनोर्‍यांचा उत्साह शिगेला ; युवकांसह युवतींच्याही पथकांच्या सरावाला वेग

पुणे : तरुणीवर बलात्कार करून व्हिडीओ चित्रीकरण

Back to top button