श्रीगोंदा : न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर व्हावा : न्यायमूर्ती अभय ओक | पुढारी

श्रीगोंदा : न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर व्हावा : न्यायमूर्ती अभय ओक

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील न्याय व्यवस्थेत काम करणारे न्यायधीश व कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी युवा वकिलांनी काम करावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले. श्रीगोंदा, जामखेड, कर्जत जिल्हा वकील बार असोसिएशनने श्रीगोंदा येथे आयोजित केलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी न्या.ओक बोलत होते. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे पूजन, न्यायमंथन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

भारतीय न्याय व्यवस्थेचे निकालपत्र सामान्य जनतेला समजण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अधिपत्याखाली स्थानिक बोलीभाषेत निकालपत्राचे रूपांतर करण्याची प्रकिया सुरू केली आहे. देशात 35 हजार निकालपत्रापैकी 9 हजार निकालपत्रे हिंदी भाषेत रूपांतरीत करण्यात आली आहेत. त्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तींचे एक मंडळ स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती न्या.ओक यांनी दिली.

न्या. ओक म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार्‍या राष्ट्रपुरुषांना नुसते स्वातंत्र मिळवून देणे नव्हे, तर भारतीयांना घटनेच्या माध्यमातून न्याय्य हक्क मिळवून देणे अधिक महत्त्वाचे होते. 75 वर्षे स्वातंत्र्याला उलटून गेली आहेत. मूलभूत अधिकार आणि हक्क काय असतात, हे अद्याप तळागाळापर्यंत पोहचले नाहीत, हा चिंतनाचा विषय आहे. आपली न्याय व्यवस्था ही घटनेवर आधारित आहे. त्यामुळे घटनेची कोणी पायमल्ली अथवा अतिक्रमण केले, तर वकिलांनी स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज निर्माण झाली आहे.

अ‍ॅड.उदय वारुंजीकर म्हणाले, वकील हा आयुष्यभराचा विद्यार्थी आहे. वकिलांनी दररोज अभ्यास करून न्यायदान सेवेत आपले कर्तव्य बजावण्याची गरज आहे. महाराष्ट्र बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेकानंद घाडगे म्हणाले, आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने वकिलांनी काम करण्याची गरज आहे.

यावेळी न्या.संतोष चपळगावकर, अ‍ॅड जयंत जायभाय, अ‍ॅड. अमोल सावंत, अ‍ॅड. गजानन चव्हाण, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, प्राचार्य सतीशचंद्र सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, अ‍ॅड. हरिश्चंंद्र महामुनी, अ‍ॅड. ए. के. शेख, अ‍ॅड. बाळासाहेब काकडे, अ‍ॅड. वैभव मेहता, नवनाथ कोंथिबीरे, सतीश मखरे उपस्थित होते. श्रीगोंदा- कर्जत-जामखेड जिल्हा बार असो.चे अध्यक्ष संतोष मोटे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी आभार मानले.

हेही वाचा

नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांमध्ये राबविणार जलयुक्त शिवार २.०

गणेश मंडळांच्या विधायक उपक्रमांना प्रशासनाचे सहकार्य : चंद्रकांत पाटील

कोल्‍हापूर : अंबाबाई मंदिरात गाभाऱ्यातून दर्शन सुरू : पालकमंत्री केसरकर

Back to top button