कुंडेश्वर डोंगरावर रानफुलांचा बहर

कुंडेश्वर डोंगरावर रानफुलांचा बहर

कडूस(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील श्री क्षेत्र कुंडेश्वर डोंगरावर प्रत्यक्षात कासचे पठार अनुभवायल मिळत आहे. यामुळे कुंडेश्वर डोंगराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. कुंडेश्वर डोंगराच्या सौंदर्याला अधिकच खुलविणारा दागिना म्हणजे माळरानावर फुलणारी रानफुले. पावसाळ्यात येथील कातळांवर हिरवी मखमली शाल अंथरलेली असते. तृणपाती वनस्पतींनी त्याचे काळे रुपडे झाकलेले असते. कातळावर तसेच माळरानावर विविध प्रकारच्या अल्पजीवी तृणपाती वनस्पती दिसून येतात. श्रावण ते आश्विन या काळात विविध रंगांची मनमोहक फुले येतात. ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांत या फुलांना गावाकडची फुले किंवा आसवे, असेही म्हटले जाते.

श्रावणात पावसाचे प्रमाण कमी होत जाते. ऊन-पावसाच्या लपंडावाच्या खेळात ही फुले आणखी बहरतात. वार्‍याच्या झुळकेसोबत ही रानफुले डौलत असतात. या रानफुलांत प्रामुख्याने फुलपत्री, सोनयाळी, कात्री, सानथले आदी फुले दिसून येतात. यातील गोप या गवती फुलांपासून गुराखी टोप्याही बनवितात. देवाला वाहण्यासाठीही काही फुलांचा वापर केला जातो. रानावनात निळ्या, जांभळ्या, पिवळ्या, गुलाबी रंगांची मुक्तहस्ते उधळण झालेल्या फुलांबरोबरच सफेद रंगाची फुलेही दिसतात. पठारांवरील रानफुलांचा हा महोत्सव पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देत आहेत. जणू कास पठाराचा आनंद येथे मिळत आहे.

हिरव्यागार गवताच्या पात्यांवर, वेलींवर वार्‍याबरोबर डोलणारी निळी, जांभळी, लाल, पिवळी, गुलाबी, पांढरी फुले बघताना, टिपताना तास-दोन तास कसे जातात, हे कळतही नाही. फुलांप्रमाणेच या भागात विविध प्रकारच्या रानभाज्यादेखील उपलब्ध होतात. त्यांची चव आणि गंध लाजवाब असतो. तो अनुभवण्यासाठी खेडचा पश्चिम भाग पर्यटकांना खुणावत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news