

पुणे : पुढारी वृत्तसेवा
गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात पहिल्यांदाच पांढर्या जांभळांची आवक सुरू झाली आहे. रविवारी घाऊक बाजारात इंदापूर तालुक्यातील सराफवाडी येथून 4 किलो जांभळांची आवक झाली. त्याला प्रतिकिलोस 410 ते 420 रुपये भाव मिळाला.
तुरट-गोड, गडद काळा रंग असलेली गरदार जांभळे म्हणजे रानमेव्यामधला एक मेवा. आता यामध्ये पांढर्या रंगाच्या जांभळांची भर पडली आहे. चव, आकाराने एरवीच्या जांभळांसारखीच मात्र रंगाने पांढरी असलेली ही जांभळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात पहिल्यांदाच दाखल झाली आहेत. मार्केट यार्डातील मे. व्ही. बी. आणि कंपनी यांच्या गाळ्यावर हंगामातील पहिली आवक झाली.
इंदापूर तालुक्यातील सराफवाडी या गावात पहिल्यांदा ओडिशातून रोपे आणून हा प्रयोग राबवला. शेतकरी भारत लाळगे यांनी एक एकर क्षेत्रावर 150 रोपांची 2019 साली लागवड केली. तीन वर्षांनंतर यंदा प्रथमच झाडांना फळधारणा झाली आहे. सध्या जांभळे तोडणी सुरू झाली आहे. येत्या काळात आणखी मालाची तोडणी करून शहरातील बाजारपेठांमध्ये पाठविण्यात येतील, अशी माहिती शेतकरी भारत लाळगे यांनी दिली.
बाजारात पहिल्यांदाच या जांभळांची आवक झाली आहे. त्याला दरही चांगला मिळत आहे. सध्या हंगाम सुरू झाला आहे. येत्या काळात या जांभळांची आवक वाढून दर काही प्रमाणात कमी होतील.
– सतीश वैरागकर, जांभूळ व्यापारी