लखीमपूर खेरी हिंसाचार : आशिष मिश्राचा जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द | पुढारी

लखीमपूर खेरी हिंसाचार : आशिष मिश्राचा जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द

पुढारी ऑनलाईन : लखीमपूर खेरी हिंसाचारातील आरोपी आशिष मिश्राचा जामीन सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. सोमवारी (दि.१८)  निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष याला एका आठवड्यात समर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.

उत्‍तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप असलेला भाजप नेता आशिष मिश्रा यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. एका आठवड्याच्या आत आरोपी आशिष याने पोलिसांना शरण जावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. लखीमपूर खिरी येथील घटनेनंतर 11 ऑक्टोबर 2021 रोजी आशिष मिश्रा याला पोलिसांनी अटक केली होती, तर गत फेब्रुवारी महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला होता.

लखीमपूर खिरी येथे अंगावर गाडी घालण्याच्या या घटनेत चार शेतकरी मृत्यूमुखी पडले होते, तर त्यानंतर झालेल्या हिंसाचारात अन्य चार लोकांचाही मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा हे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेणी यांचे पूत्र आहेत. बळी पडलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांनी आशिष यांचा जामीनअर्ज रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, पीडित पक्षाची सुनावणी योग्य प्रकारे झाली नाही आणि जामीन देण्याची घाई केली असल्याने हा जामीन रद्द होत आहे. त्यामुळे या प्रकरणात आशिष मिश्रा याला अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आणि पुन्हा ही केस सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे दिली आहे. तसेच यावर आशिष मिश्रा याच्या जामिनावर वेगळे खंडपीठ विचार करु शकते, अशी टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने सोमवारच्या सुनावणीदरम्यान केली आहे.

हेही वाचलत का ?

 

Back to top button