Shanghai Corona : चीनच्या शांघायमध्ये परिस्थिती गंभीर, लॉकडाऊनमध्ये पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद | पुढारी

Shanghai Corona : चीनच्या शांघायमध्ये परिस्थिती गंभीर, लॉकडाऊनमध्ये पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद

शांघाय; पुढारी ऑनलाईन

चीनमधील शांघाय (Shanghai Corona) शहरात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. येथे रुग्णसंख्या वाढल्यानंतर संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आता येथे तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. तिन्हीही मृत व्यक्ती वृद्ध आहेत. यात ८९ आणि ९१ वर्षीय दोन महिला आणि ९१ वर्षीय वृद्ध पुरुषांचा समावेश आहे.

आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये रुग्णांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर येथे मार्चपासून निर्बंध लागू करण्यात आले होते. यामुळे शांघाय शहरातील अडीच कोटी रहिवाशी त्यांच्या घरांमध्ये अडकून पडले आहेत. येथे दररोज २५ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. शांघाय शहर फायनान्शिअल हब म्हणून ओळखले जाते.

कोरोना संसर्गामुळे शांघाय शहरातील क्वारंटाईन सेंटर्समध्ये रुग्णांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही. याच दरम्यान, शांघायमध्ये तीन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा अधिकृत खुलासा शांघाय महापालिकेच्या आरोग्य कमिशनने केला आहे. रुग्णालयात गेल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना वाचविण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, ईस्टर्न बिझनेस हबमध्ये सोमवारी २२,२४८ नवे रुग्ण आढळले. कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. सर्वात वाईट स्थिती आर्थिक राजधानी शांघायची आहे. येथे संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोणत्याही कारणाशिवाय लोकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. केवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीतच घरातून बाहेर पडता येते. (Shanghai Corona)

हे ही वाचा :

Back to top button