पुढारी ऑनलाईन डेस्क : भोंगा प्रकरणारून राज्यात वातावरण तापलं असताना राज ठाकरे यांनी ३ तारखेपर्यंतचा अल्टिमेट दिल्यामुळे राज्य सरकार चांगलंच गंभीर झालेलं दिसत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत कोणती चर्चा होणार, भोंग्यासंदर्भात कोणते निर्णय घेतले जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
सर्व धर्मातील लोकांना भोंगे आणि लाऊड स्पीकर लावायचा असेल स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल, असे गृहमंत्रालयाकडूनच सांगण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी कशी करायची, यादृष्टीने महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासास्थानी होणार आहे. (भोंगा प्रकरण)
राज्यात सध्या मशिदींवरी भोंग्यांवरुन राजकारण तापलेले असताना नाशिक पोलीस आयुक्तांनी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. नाशिक शहरातील सर्व प्रकारचे भोंगे आणि ध्वनिक्षेपके उतरविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असून विनापरवानगी कोणत्याही धार्मिक अथवा अन्य ठिकाणी लाऊड स्पीकर लावता येणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तीन मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरविल्यास लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा पठण करण्याचे आवाहन हिंदु बांधवांना राज ठाकरे यांनी केले आहे. अशात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी हे आदेश दिले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अनधिकृत भोंग्यांबाबत अशा स्वरुपाचे परिपत्रक जारी करणारे नाशिक हे पहिलेच शहर ठरले आहे.
तसेच मंदिर, मशिद, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळांना 3 मे पर्यंत भोंग्यासाठी परवानगी घेण्याची मुभा असणार आहे. त्यानंतर मात्र अनधिकृत भोंगे जप्त करण्यात येऊन कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मशिदींच्या 100 मीटर परिसराच्या आत हनुमान चालिसा पठणास मनाई करण्यात आली आहे.
पहा व्हिडिओ : कोल्हापुरात मतदारांनी भाजपला का नाकारलं?