

वाघोली: पुणे-नगर महामार्गावरील वाघोलीतील आव्हाळवाडी फाटा या मुख्य चौकात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विशेष म्हणजे, या चौकातच काही रिक्षाचालक खुलेआम, तेही वाहतूक पोलिसांसमोरच अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीमुळे केवळ वाहतुकीत अडथळा निर्माण होत नाही, तर अपघातांचा धोकादेखील वाढला आहे.
सकाळी आणि संध्याकाळी आव्हाळवाडी चौकात मध्यभागी रिक्षांची रांग लागते. वाहतूक पोलिस चौकात वाहतूक नियमन करीत असताना पोलिसांसमोरच बिनधास्त रिक्षाचालक अवैध प्रवासी वाहतूक करतात. मात्र, पोलिस याकडे डोळेझाक करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
या चौकात लगतच आठवडी बाजार भरतो. त्या दिवशी तर रिक्षाचालकांचा कहरच पाहायला मिळतो. पुणे-नगर महामार्गावर मोठी वाहनांची वर्दळ असताना वाहतूक पोलिस काही रिक्षाचालक प्रवासी मिळविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वाहन उभे करतात. परिणामी, वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. अनेकदा नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी करून देखील कारवाई केवळ कागदोपत्री मर्यादित राहते.
‘वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीतच अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याने कायद्याचा धाक उरला नाही,’ अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटत आहेत. आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा (पोलिस स्टेशनसमोरच), लोहगाव-वाघोली रस्त्यावरील वाघेश्वर चौक, बकोरी फाटा या ठिकाणी बिनधास्त वाहतूक होत असल्याने वाहतूक पोलिसांचे आर्थिक हितसंबंध आहेत की काय? अशी शंका निर्माण होत आहे.
आधी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. त्याबरोबर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल.
राहुल कोलंबीकर, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, वाघोली