

पुणे: सुखी संसाराच्या 34 वर्षांनंतर संसारातील रस संपल्याने तो पत्नीपासून विभक्त राहू लागला. येत्या काळात एकत्र येण्याची शक्यता नसल्याने दोघांनी परस्परसंमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला.
दोघेही आठ वर्षांपासून विभक्त राहत असल्याने न्यायालयानेही कुलिंग पीरियडचा सहा महिन्यांचा कालावधी वगळता घटस्फोट मंजूर केला अन् आठ वर्षांच्या वैवाहिक दुराव्यानंतर 34 वर्षांचा संसार संपुष्टात आला.
विजय आणि विजया (दोघांचीही नावे बदललेली आहेत.) तो 64 वर्षांचा, तर ती 55 वर्षांची. 1983 साली त्यांचा विवाह झाला. यादरम्यान त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. सुखी संसाराच्या काही वर्षांनंतर दोघांमध्ये पटेनासे झाले. त्यानंतर विजय हा विजयाला सोडून वेगळे राहू लागला. यादरम्यान विजया पुण्यात तर विजय हा मुंबई येथे वास्तव्यास होता.
आठ वर्षे विभक्त राहिल्यानंतर एकत्र येण्याची शक्यता नसल्याने विजया हिने ॲड. विराज गणेश गायकवाड यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यास विजय यानेही संमती दिल्याने न्यायालयाने परस्परसंमतीने केलेला अर्ज मंजूर केला.
दाम्पत्यामध्ये दीर्घकाळ चाललेल्या मतभेदांनंतरही दोघांनीही संयम दाखवत कायदेशीर मार्गाने आपला प्रश्न सोडवला, ही सकारात्मक गोष्ट आहे. न्यायालयाने सहा महिन्यांचा ’कुलिंग पीरियड’ वगळत दिलेला निर्णय हा दोघांच्या हिताचा असून, त्यांच्या पुढील आयुष्याला नवी दिशा देणारा आहे. मतभेद वाढत असतानाच भावनिक, मानसिक तणावही वाढतो. अशावेळी अनावश्यक वादविवाद वाढविण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने प्रश्न मार्गी लावणे आणि नवीन आयुष्याला सुरुवात करणे, हा उत्तरदायी निर्णय आहे.
ॲड. विराज गणेश गायकवाड, पती आणि पत्नीचे वकील