

भाजपचे ज्येष्ठ नेते, पक्षाचे प्रदेश संयोजक नगरविकास प्रकोष्ट, आपला परिसर या संस्थेचे संस्थापक, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि नागरी प्रश्नांवर काम करणारे अभ्यासू व बेधडक कार्यकर्ते अशी उज्ज्वल केसकर यांची ओळख. ‘भाजयुमो’चे प्रचार व प्रसिद्धीप्रमुख, पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता ते नगरसेवक, असा त्यांचा चढता राजकीय आलेख. नगरसेवक म्हणून केसकर यांनी 1997 मध्ये महापालिकेत पहिले पाऊल ठेवले. इच्छुक उमेदवार, पक्षातील आपल्याच स्पर्धकाचे प्रचारप्रमुख ते स्वीकृत नगरसेवक, हा त्यांचा प्रवास फारच गमतीशीर असल्याने त्यांच्या मनावर तो कायमचा कोरला गेला. या निवडीच्या रंगतदार आठवणी त्यांच्याच शब्दांत...
माझ्या जीवनात सदैव लक्षात राहिलेली निवडणूक म्हणजे 1997 ची. मी इच्छुक उमेदवार होतो. एकंदरीत, वॉर्डरचनाही पक्षाला अनुकूल अशीच होती.भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून मी सक्रिय होतो. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेत एक महत्त्वाचा घटक म्हणूनही मी कार्यरत होतो. या यात्रेच्या प्रसिद्धीची जबाबदारी माझ्यावर होती. ‘भाजयुमो’चा प्रचार व प्रसिद्धीप्रमुख म्हणूनही मी काम करीत होतो. त्यामुळे मला तिकीट मिळेल, अशी माझी अपेक्षा होती.
तत्कालीन आमदार गिरीश बापट आणि शहराध्यक्ष प्रदीप रावत या नेत्यांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी खूप चांगले संबंध होते. त्यामुळे या निवडणुकीचेही ते अघोषित प्रमुखच होते. त्या काळी कोथरूडवर शिवसेनेचे राज्य होते. शिवसेनानेते शशिकांत सुतार यांचा कोथरूडमध्ये चांगलाच दबदबा होता.भाजपचे सरचिटणीस बाळासाहेब मोकाटे कोथरूडमध्ये पक्षाचे काम करीत होते. जनसंघापासून ते पक्षाशी एकनिष्ठ होते. मात्र, सुतार यांच्यामुळे भाजपच्या एकाही उमेदवाराला या परिसरातून निवडणूक जिंकता आलेली नव्हती. त्यामुळे साहजिकच शहराध्यक्ष प्रदीप रावत हे बाळासाहेब मोकाटे यांना उमेदवारी देण्यासाठी आग््राही होते, तर गिरीश बापटही त्याला अनुकूल होते. ज्या वॉर्ड क्रमांक 48 मधून मी निवडणूक लढविण्यास उत्सुक होतो तेथून बाळासाहेब मोकाटे यांना तिकीट देण्याचे प्रदीप रावत आणि गिरीश बापट या दोघांनी ठरवून टाकले होते.
एक दिवस बापटसाहेबांनी मला बोलावून घेतले आणि सांगितले की, शहराध्यक्ष प्रदीप रावत हे बाळासाहेब मोकाटेंसाठी आग््राही आहेत व त्यात काही चूकही नाही. बाळासाहेब अनेक वर्षे काम करीत आहेत. परंतु, त्यांना कधी नगरसेवकपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता तुला तिकीट देता येणार नाही. बापटांच्या या निर्णयामुळे मी नाराज झालो होतो. मग मी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना फोन केला व सांगितले की, मला निवडणूक लढवायची आहे. परंतु, शहर नेतृत्व बाळासाहेब मोकाटे यांच्यासाठी आग््राही आहे. आता तुम्हीच मला तिकीट द्या. त्यावर मुंडेसाहेब मला म्हणाले की, जर शहराचे नेतृत्व हे बाळासाहेब मोकाटे यांच्यासाठी आग््राही असतील, तर त्यात मी हस्तक्षेप करणार नाही. पण, तुला नगरसेवक करण्याचा शब्द मी देतो. मुंडेसाहेबांवर माझी श्रद्धा होती आणि मी त्यांचा अनुयायी होतो. त्यामुळे मी म्हणालो, ‘आता मी काय करू?’ त्यावर ते म्हणाले, ‘तू बाळासाहेब मोकाटे यांच्या घरी जा आणि त्यांना शुभेच्छा दे व त्यांच्या निवडणुकीत प्रचाराचे कामही कर, बाकी काय करायचे ते मी पाहतो.’ मुंडे साहेबांच्या सूचनेप्रमाणे मी बाळासाहेब मोकाटे यांच्या घरी गेलो. त्यांना म्हणालो, ‘आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया. मी काय काम करावे, हे तुम्हीच मला सांगा.’ तेव्हा बाळासाहेब म्हणाले, ‘तूच सर्व काही ठरव, त्याप्रमाणेच आपण प्रचार करू. आता तूच माझा निवडणूक प्रचारप्रमुख आहेस, हे लक्षात ठेव. बाळासाहेब मोकाटे या व्यक्तीसाठी नाही तर पक्षासाठी काम कर,’ असेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे मी सर्व आखणी केली. बाळासाहेब मोकाटे यांचा निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून कामाला लागलो.
निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे जितके नगरसेवक निवडून येतील, त्या प्रमाणात स्वीकृत नगरसेवक देण्याचा विषय चर्चेला येऊ लागला. तेव्हा मला वाटले की, आता आपण मुंडेसाहेबांना भेटले पाहिजे. मग मी मुंबईत रामटेकवर गेलो. साहेबांना भेटलो. ते म्हणाले, ‘तू मला काहीही सांगू नकोस, मला जे करायचे ते मी करेन. आता तू पुण्याला परत जा.’ साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी पुण्यात परतलो. त्यानंतर तीन दिवसांनी मुंडेसाहेबांचा फोन आला. ते म्हणाले, ‘त्वरित मुंबईला ये’ आणि स्कूटरवरून येऊ नकोस. मी आणि विकास मठकरी मुंबईला नेहमी दुचाकीवरून जात होतो, हे साहेबांना चांगले माहीत होते.
त्या वेळेस मी माझ्या सासऱ्यांची फियाट घेतली आणि मुंबईला निघालो. त्या वेळी नुकतेच मोबाईल आले होते. माझ्याकडे पेजर आणि मोबाईल दोन्ही होते. प्रवासात असतानाच साहेबांचा फोन आला. त्यांनी कुठपर्यंत पोहचला आहेस? अशी विचारणा केली. मी म्हणलो, मी दादरपर्यंत आलोय. त्यावर ते म्हणाले, तू थेट मातोश्रीवर ये. रस्ता विचारत विचारतच मी मातोश्रीपाशी पोहचलो. पंधरा-वीस मिनिटांतच साहेबांचा ताफा तेथे आला. मी उभाच होतो. ते म्हणाले, चल. त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच मी मातोश्रीमध्ये गेलो. ते म्हणाले, मी बाळासाहेबांना भेटून येतो, तोवर येथेच बस. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी वाट पाहत थांबलो. परत येताच ते म्हणाले, ‘पुण्याला परत जा अन् कागदपत्रे पूर्ण कर. आता तू नगरसेवक झाला आहेस.’
मला त्यांच्या या वाक्याचा अर्थच समजला नाही. म्हणून मी विचारले, ‘साहेब, मी नगरसेवक कसा काय झालो?’ त्यावर मुंडे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर तात्या कदम शिवसेनेत आले आहेत. पिंपरी-चिंचवडमधून शिवसेनेला त्यांना नगरसेवक करायचे आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील एक जागा सेनेला हवी होती. त्या बदल्यात त्यांची पुण्यातील जागा भाजपसाठी घेतली.’
माझ्या नगरसेवकपदाची खरी गंमत तर येथून पुढेच सुरू झाली. जी जागा सुटली तेथून भाजपचे एक ज्येष्ठ नेते निवडणूक लढविण्यास उत्सुक होते. परंतु, ज्येष्ठ नेत्याने निवडणूक लढविण्यापेक्षा तेथून अन्य कोणीतरी लढावे व स्वीकृत म्हणून या ज्येष्ठ नगरसेवकाला सामावून घ्यावे, असा विचार पुढे आला. मग त्या जागी विजय काळेंना संधी मिळाली व ते तेथून निवडूनही आले. आता स्वीकृत म्हणून कोणाचे नाव वरिष्ठांकडे पाठवायचे? असा प्रश्न शहराध्यक्षांना पडला. त्या वेळी प्रदीप रावत आणि गिरीश बापट यांनी त्या ज्येष्ठ नेत्याबरोबरच माझेही नाव वरिष्ठांकडे पाठवून दिले आणि शब्द दिल्याप्रमाणे मुंडेसाहेबांनी मला नगरसेवक केले. अशारीतीने 1997 मध्ये मी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा स्वीकृत नगरसेवक बनलो.
ज्यांचा प्रचारप्रमुख म्हणून मी काम केले होते ते बाळासाहेब मोकाटे देखील दिग्गजांना पराभूत करून विजयी झाले होते. मला स्वीकृत नगरसेवक करण्याचे सारे श्रेय मुंडेसाहेब, प्रदीप रावत आणि गिरीश बापट यांना जाते. माझ्या पहिल्याच निवडीत इतक्या गमतीशीर घडामोडी घडल्याने ही निवडणूक माझ्या कायमची आठवणीत राहिली.