

पुणे: देशातील बाजारपेठांमध्ये परदेशी सफरचंदाचा दबदबा वाढला असून, त्यामध्ये पोलंडच्या रॉयल गाला या सफरचंदाने बाजी मारल्याचे चित्र गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात दिसून येत आहे.
बाजारात दाखल होणाऱ्या सफरचंदामध्ये पोलंडच्या सफरचंदाचे प्रमाण सर्वाधिक असून, त्याच्या 18 किलोला 4 हजार ते 4 हजार दोनशे रुपये दर मिळत आहे. तर, देशी सफरचंदाचा हंगाम जवळपास संपल्याने या फळांची आवक कमी असल्याचे सांगण्यात आले.
पोलंड येथून समुद्रमार्गे मुंबई व येथून रस्तेमार्गाने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात सफरचंद दाखल होत आहे. याखेरीज इटली, अमेरिका, इराण, अफगाणिस्तान आणि काही प्रमाणात टर्की येथूनही सफरचंद बाजारात येत आहे.
मात्र, पोलंडच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमी आहे. सध्या पोलंडच्या सफरचंदाचा हंगाम सुरू झाल्याने आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. एप्रिलपर्यंत हा हंगाम सुरू राहील. देशात दरवर्षी साधारण दोन ते अडीच हजार कंटेनर सफरचंद दाखल होतात.
मागील पाच वर्षांत या आवकेत सातत्याने वाढ होत असल्याची माहिती डी. बी. उरसळ अँड ग््राँडसन्सचे संचालक आणि आयातदार रोहन उरसळ यांनी दिली.