पुण्यातील वारसास्थळांवर जी-20चे प्रतिनिधी भारावले

पुण्यातील वारसास्थळांवर जी-20चे प्रतिनिधी भारावले
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जी 20 बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी मंगळवारी पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. परदेशी पाहुण्यांसाठी 'हेरिटेज वॉक' अंतर्गत शनिवार वाडा, लालमहाल आणि नानावाड्याला भेट आयोजित करण्यात आली होती. शनिवारवाड्याची भव्यता पाहून पाहुणे अचंबित झाले, तर लालमहालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास जाणून घेत स्तिमितही झाले.
शनिवारवाड्यापासून या भेटीला सुरुवात झाली. शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना प्रश्नही विचारले. पारंपरिक ढोलताशाच्या गजरात लालमहल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. महालातील छायाचित्रेही त्यांनी आपल्या मोबाईमध्ये टिपली.

भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नानावाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला. शनिवारवाडा येथे पिंगळा, वासुदेव, पारंपरिक गोंधळी कलाकारांनी कलेचे सादरीकरण केले. गोंधळी बांधवांनी संकेतभाषा कला असलेल्या करपल्लवीचे सादरीकरण करत बोटांच्या संकेतातून पाहुण्यांची नावे ओळखल्याने पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पारंपरिक कुंभार कलेअंतर्गत चाकावर मातीची भांडी करण्याची कला प्रदर्शित करण्यात आली. अजित आपटे, संदीप गोडबोले, सुप्रिया शेलार यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसास्थळांबाबत माहिती दिली. या वेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल, महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news