दर्शनाला व्हायचं होतं कलेक्टर; पण..! | पुढारी

दर्शनाला व्हायचं होतं कलेक्टर; पण..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कामगार वसाहतीतलं दोन खोल्यांचं घर… सतत वर्दळीचा कारखाना परिसर… ना अभ्यासासाठी खास सोई… दर्शना मात्र जिद्दीनं लढली. तिच्या कष्टासमोर परिस्थितीचे बुरुज ढासळले. ड्रायव्हरची लेक ते क्लास वन अधिकारी हे तिनं शक्य करून दाखवलं. एमपीएससीच्या यशानं दर्शनाच्या स्वप्नांच्या प्रवासाला बळ मिळालं होतं. त्यापुढेही जाऊन तिला कलेक्टर व्हायचं होतं. मात्र, तिच्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून वन परिक्षेत्र अधिकारी या पदी निवड झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. मात्र, तिच्या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जो मित्र तिच्यासोबत गेला तो देखील फरार आहे. त्याचे एकूण वर्तन संशयास्पद आहे. जोपर्यंत तो पोलिसांना मिळत नाही तोपर्यंत दर्शनाचा मृत्यू हा गूढच आहे. पुणे शहर व ग्रामीण पोलिसांची पथके संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.

26 वर्षीय दर्शनाची मार्च 2023 मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावर निवड झाली होती. दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची होती. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात कार्यरत वाहनचालक दत्तू पवार यांची दर्शना कन्या होती. एमपीएससीतील यशानंतर पुन्हा स्वप्नांना भिडण्यासाठी दर्शना सिद्ध झाली होती. मात्र, काळाच्या घाल्यासमोर दर्शनाची स्वप्ने मातीमोल झाली अन् ड्रायव्हर बापाला कलेक्टरच्या गाडीत फिरवण्याचं दर्शनाचं स्वप्न अधुरंच राहिलं. दर्शनाचे कुटुंबीय, शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी यांनी उलगडलेल्या आठवणींतून दर्शनाचा जिद्दी संघर्षपट समोर आला आहे.

कोल्हे कारखान्याच्या कामगार वसाहतीत वाढलेल्या दर्शनाने शालेय जीवनापासूनच कलेक्टर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. शालेय शिक्षण ते विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणापर्यंत दर्शनाच्या शैक्षणिक कारकिर्दीचा आलेख चढताच राहिला होता. कोपरगावातील इंग्रजी माध्यमाच्या शारदा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तिने शालेय शिक्षण पूर्ण केले होते. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या दर्शनाने पदव्युत्तर शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गाठले. एक दिवस कलेक्टर बनणारच, अशा ठाम निर्धार दर्शनाचा असायचा. स्वयं-अध्ययनावर भर देत दर्शनाने जोरदार तयारीला सुरुवात केली होती.

दीड वर्षे दर्शनाची सातत्याने तयारी सुरू होती. दरम्यानच्या काळात गणित विषयात दर्शनाचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले होते. विशेष म्हणजे, विद्यापीठात पहिल्या पाच विद्यार्थ्यांत येण्याची किमया तिने साधली होती. पुण्यासारख्या शहरात राहण्याचा खर्च, निवासाच्या सोई, यामुळे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दर्शनाने कोपरगावची वाट धरली आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास घरी सुरू ठेवला. स्वयं-अध्ययनाच्या बळावर दर्शनाने अशक्य ते शक्य करून दाखविले.

चटका लावणारा शेवट
महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत दर्शना महाराष्ट्रात तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. वाहनचालकाच्या लेकीने क्लास वन पदाला गवसणी घातल्यामुळे दर्शनावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. अभिनंदनाचे बोर्ड कोपरगाव शहरासह तालुक्यात झळकले होते. दर्शनासह कुटुंबाला तिच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती. मात्र, त्यापूर्वीच घडलेल्या अघटितामुळे स्वप्न मातीमोल झाले. दर्शनाच्या दुर्दैवी मृत्यूच्या बातमीने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. दर्शनाच्या कुटुंबावर मानसिक आघात झाला आहे. एका जिद्दीच्या स्वप्नाचा करुण अंत दर्शनाला प्रत्यक्ष ओळखणार्‍या, न ओळखणार्‍या प्रत्येक संवदेनशील मनाला निश्चितच चटका लावणारा आहे.

हे ही वाचा : 

Titanic tourist submarine : टायटॅनिकचे अवशेष पहायला गेलेल्या पानबुडीत पाकिस्तानच्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश

Wrestling Federation of India : कुस्ती महासंघाची निवडणूक लांबणीवर

 

Back to top button