कुरुलकरने पाकिस्तानी आयडीवर पाठविले मेल

कुरुलकरने पाकिस्तानी आयडीवर पाठविले मेल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या ईमेल आयडीवरून पाकिस्तानध्ये मेल पाठविण्यात आले आहेत. तसेच, पाकिस्तानमधूनही ईमेल प्राप्त झाल्याचे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या तपासातून पुढे आले आहे. या मेलची माहिती गुगलने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाली असून, त्यात नेमके काय संभाषण झाले हे अद्याप समोर आलेले नाही.
कुरुलकर याने देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही फोटो शेअर केले आहेत. 2022 मध्ये कुरुलकरने शासकीय पारपत्राद्वारे सहा देशांमध्ये प्रवास केला आहे. नेपाळ, मलेशिया यांसह अन्य देशांच्या प्रवासादरम्यान तो कोणाकोणाला भेटला याची माहिती घेतली जात आहे. तपासादरम्यान काही नावे निष्पन्न झाली आहेत, अशी माहिती एटीसएच्या तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी मंगळवारी न्यायालयात दिली.

डॉ. कुरुलकर याच्या एटीएस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला मंगळवारी (दि. 9) न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी, सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. विजय फरगडे व बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. ऋषिकेश गानू यांनी बाजू मांडली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणावर युक्तिवाद झाला. युक्तिवादादरम्यान अ‍ॅड. फरगडे म्हणाले, डॉ. कुरूलकर याचा मोबाईल संच आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. दरम्यान, मोबाईलचा अहवाल प्राप्त झाला असून, संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणामधून माहिती नष्ट करण्यात आल्याचे समोर येत आहे. कुरूलकरला पीआयओने भारतीय नंबरवरून मला का ब्लॉक केले असा संदेश पाठविला असून, त्याबाबत सखोल तपास करायचा असल्याने त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाला केली. कुरुलकरच्यावतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. ऋषिकेश गानू म्हणाले, रिमांड रिपोर्टमध्ये असलेल्या कारणांचा विचार केला असता पोलिस कोठडीची गरज नाही. पूर्वीदेखील एटीएसने चौकशी केली आहे. तसेच पुढील तपासासाठी आम्ही सहकार्य करण्यात तयार आहोत. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकत कुरूलकर याच्या पोलिस कोठडीत 15 मेपर्यंत वाढ केली.

डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये महिलांना भेटला
कुरूलकर हा डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना भेटला आहे. त्याअनुषंगाने गेस्ट हाऊसच्या रेकॉर्डची माहिती मागविण्यात आली आहे. ती अद्याप मिळाली नसून ती प्राप्त झाल्यानंतर त्या महिला कोण, तसेच त्यामध्ये कोणी पाकिस्तानी हेर होते का याचादेखील तपास सध्या एटीएसकडून सुरू आहे.

जप्त केलेल्या डिव्हाईचा फॉरेंसिक रिपोर्ट दाखल
कुरुलकर याच्या हालचाली आणि वर्तन संशयास्पद वाटल्याने जानेवारी महिन्यात त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला होता. त्याचा फॉरेंसिक रिपोर्ट मंगळवारी न्यायालयात दाखल करण्यात आला. या डिव्हाईसमधील काही डेटा त्याने डिलीट केला आहे, असे रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. 2019 नंतर मी शासकीय पासपोर्टवर कुठेही गेलेलो नाही. पासपोर्टच्या नोंदी तपासल्या असता ते लक्षात येईल, असे कुरुलकरने न्यायालयास सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news