खडकवासला : पानशेत धरणफुटीत माणुसकीचे दर्शन

खडकवासला : पानशेत धरणफुटीत माणुसकीचे दर्शन

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भल्या सकाळी पुराचे लोंढे सुरू होते अन् पाण्यात मृत जनावरे तरंगत होती… नदीकाठच्या पानशेत, कुरण बुद्रुक, मालखेड, सांगरुण आदी गावांत पाणी शिरले… जीव वाचवण्यासाठी लहान लेकरांसह माणसे डोंगर, टेकड्यांचा आश्रय घेत होती अन् मदतीसाठी ग्रामस्थ एकमेकांना आधार देत होते… त्यावेळी वडीलधार्‍यांनी माणुसकीचे दर्शन घडविले…ही आठवण सांगताना ओसाडे येथील ज्येष्ठ शेतकरी सखाराम लोहकरे यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले!

खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात मावळा संघटना व ग्रामस्थांच्या वतीने पानशेत धरणफुटीच्या घटनेचे साक्षीदार असलेल्या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. सिंहगड, पानशेत भागातील ज्येष्ठ शेतकर्‍यांच्या आठवणींतून धरणफुटीच्या रोमांचकारी घटनांचा इतिहास जिवंत झाला. 12 जुलै 1961 रोजी पानशेत धरण फुटले. या घटनेस गेल्या 12 जुलै रोजी 62 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त महापुरात जीव धोक्यात घालून मदतकार्य करणार्‍या ज्येष्ठांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन या वेळी सन्मान करण्यात आला.

धरणफुटीचे साक्षीदार खानापूर येथील शेतकरी सखाराम कृष्णाजी जावळकर, लोहकरे, काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष रघुनाथ यादव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पारगे यांनी आठवणींना उजाळा दिला. हवेली तालुका देखरेख संघाचे संचालक लक्ष्मण माताळे, प्राचार्य हेमंतकुमार शिंदे, पानशेत जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अनुराग मारके, वरसगावच्या कनिष्ठ अभियंता प्रतीक्षा मारके, दीपककुमार यादव आदी या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक शशिकांत जाधव यांनी केले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news