आकाशगंगेसारख्या तारा प्रणालीत छुपा ग्रह? | पुढारी

आकाशगंगेसारख्या तारा प्रणालीत छुपा ग्रह?

वॉशिंग्टन : अनेक आकाशगंगा या सर्पिलाकार भुजा असणार्‍या असतात. आपली ‘मिल्की वे’ नावाची आकाशगंगाही अशाच आकाराची आहे. मात्र, ब्रह्मांडात केवळ आकाशगंगांचाच आकार असा नसतो. आता एका अशा तारा प्रणालीचा शोध लावला आहे जिचा आकारही असाच सर्पिलाकार भुजांसारखा आहे. या प्रणालीत एखादा ग्रहही दडलेला असू शकतो, असे संशोधकांना वाटते.

‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. आपल्या तार्‍याभोवती धुळीच्या तबकडीमधून फिरत असताना हा महाकाय ग्रह अशा सर्पिलाकार भुजा बनवत असावा असा अंदाज आहे. अ‍ॅरिझोना युनिव्हर्सिटीतील केव्हीन वॅगनर यांनी सांगितले की या सर्पिलाकार भुजा मोठ्या आकाराच्या ग्रहांमुळे निर्माण होत असाव्यात याचे सज्जड पुरावे आमच्याकडे आहेत. या बाह्यग्रहाला संशोधकांनी ‘एमडब्ल्यूसी 758 सी’ असे नाव दिले आहे.

पृथ्वीपासून 500 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावरील अतिशय नव्या अशा तारा प्रणालीत हा ग्रह आहे. त्याचा तारा हा अद्यापही ‘प्रोटोप्लॅनेटरी डिस्क’ म्हणजेच ग्रहांना जन्म देणार्‍या धुळीच्या तबकडीत मध्यभागी स्थित आहे. हा ताराही नवजातच आहे. अशा तबकडीत धूळ आणि खडकाळ सामग्री असते. त्यामधूनच नवे ग्रह, चंद्र आणि लघुग्रह आकाराला येत असतात. अशा सामग्रीमधून हा महाकाय ग्रह फिरत असल्याने या सर्पिलाकार भुजांची रचना बनली असावी असे संशोधकांना वाटते.

Back to top button