

परिंचे : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे पौष वद्य पौर्णिमेला श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांची पालखी सर्व लवाजम्यासह लग्नाचे पहिले (अवतान) आमंत्रण देण्यासाठी भक्तराज कमळाजी मंदिर नगरखाना येथे शुक्रवारी (दि. 2) रात्री धुपारतीनंतर भक्त भेटीसाठी गेले होते. या वेळी पौर्णिमेच्या लखलखत्या चांदण्यारात्री श्रीनाथ जोगेश्वरी व भक्तराज कमळाजी यांच्या भक्तीचा आणि शक्तीचा अनोखा संगम सोहळा रंगला होता.
भक्तराज कमळाजी मंदिराला नेत्रदीपक विद्युत रोषणाई केली होती. या वेळी देवस्थान ट्रस्टमार्फत आसमंत उजळवून टाकणारी आतषबाजी करण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी मानकरी, सालकरी, दागिनदार, गुरव, घडशी, पुरोहित, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ व अनेक भाविकभक्त उपस्थित होते.
पौष पौर्णिमेनिमित्त देवाला पहाटे पूजा करून अभिषेक करण्यात आला. या वेळी देवांना विशेष पोशाख करण्यात आला होता. सकाळपासून मानकरी भाविक यांचे देवाला अभिषेक चालू होते. या वेळी समस्त मानकरी शिंगाडे यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री नऊ वाजता धूपारती झाल्यावर देवाची पालखी मानाच्या काट्या, निशान, छत्री, अब्दागिरी, ढोलताशा, सर्व लवाजम्यासह भक्त भेटीला श्री कमळाजी मंदिर येथे गेले. भक्तराज कमळाजी मंदिरासमोर छबिना होऊन वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काट्यांची भेट झाली. या वेळी नगर खाण्यावर सनई चौघड्याचे वादन करण्यात आले. श्रीनाथ जोगेश्वरी व भक्तराज कमळाजी यांच्या भेटीचा संगम सोहळा झाल्यानंतर रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री पालखी परत देऊळ वाड्यात येऊन भेट सोहळ्याची सांगता करण्यात आली.
महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी व जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा वीर येथे सालाबाद प्रमाणे होत असते. याही वर्षी बारा दिवस यात्रा असल्यामुळे महाराष्ट्रातून तसेच परराज्यातून अनेक भाविक भक्त मुक्कामी येणार आहेत. त्या दृष्टीने मंदिर प्रशासनाच्या वतीने नियोजन सुरू असल्याचे देवस्थान ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
यात्रेसाठी अवघा एक महिना कालावधी राहिल्यामुळे यात्रेचे संपूर्ण नियोजन करण्यात देवस्थान ट्रस्टने कंबर कसली आहे. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारी व जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा वीर येथे एक फेबुवारीपासून चालू होऊन 12 फेबुवारीला पारंपरिक रंग शिंपणाने समाप्त होणार आहे. देवस्थान ट्रस्टने ही यात्रापूर्व बैठकीचे आयोजन करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे पत्रव्यवहार करण्याचे चालू केले आहे.