

पुणे : महापालिका निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरोधात लढणार आहे. तर जागावाटपाचा समन्वय ढासळल्यामुळे काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि मनसे या मित्र पक्षांमध्ये 41 पैकी 14 प्रभागांत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आठ प्रभागांत काँग्रेस, चार प्रभागांत ठाकरे गटाची शिवसेना, तर दोन प्रभागांत मनसेचे चारही उमेदवार एकाच चिन्हावर रिंगणात उतरणार आहेत. तर काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना 24 जागांवर एकमेकांविरोधात लढणार आहेत, तर शिवसेना-मनसेमध्ये एका प्रभागातील एका जागेवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आघाडीतून बाहेर पडल्याने काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेना-मनसे युती जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या काही जागा मनसेला देण्याचे ठरले होते. मात्र, उमेदवारी जाहीर करताना तिन्ही पक्षांनी जादा एबी फॉर्म वाटले. त्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. त्याचेच परिणाम आता प्रत्यक्षात दिसत आहेत. त्यातून नऊ प्रभागांत काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांचे उमेदवार एकाच मैदानात उतरल्याने ‘मैत्रीपूर्ण’ लढत रंगणार आहे.
येथे होणार मैत्रीपूर्ण लढत
फुलेनगर-नागपूर चाळ (प्रभाग 2) मध्ये ‘अ’ गटात काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना आमने-सामने आलेत. खराडी-वाघोली (प्रभाग 4) च्या ‘क’ गटात, तर कल्याणीनगर-वडगाव शेरी (प्रभाग 5) मधील ‘ब’ गटातही दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. येरवडा-गांधीनगर (प्रभाग 6) मध्ये चारपैकी तीन गटांत काँग्रेस व ठाकरे शिवसेनेने उमेदवार दिल्याने येथेही मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. कोंढवा खुर्द-कौसरबाग (प्रभाग 19) येथे काँग्रेसने चारही उमेदवार उतरवले असून, त्याच प्रभागात ठाकरे शिवसेना आणि मनसेने प्रत्येकी दोन उमेदवार दिल्याने काँग्रेसला आघाडीतील मित्रपक्षांशीच लढावे लागणार आहे. घोरपडे पेठ-समताभूमी (प्रभाग 26) आणि सहकारनगर-पद्मावती (प्रभाग 36) येथेही एकमेकांसमोर आल्याने मैत्रीपूर्ण लढत रंगणार आहे.
एकाच चिन्हावर लढणार आघाडीचे काही उमेदवार
आघाडी असूनही तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना एकच पक्षचिन्ह मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यामुळे प्रभाग क्रमांक 4 खराडी-वाघोली, प्रभाग क्रमांक 6 येरवडा-गांधीनगर, प्रभाग 8 औंध-बोपोडी, प्रभाग 13 पुणे स्टेशन-जय जवाननगर, प्रभाग 16 हडपसर-सातववाडी, प्रभाग 18 वानवडी-साळुंखे विहार, प्रभाग 26 घोरपडे पेठ-गुरुवार पेठ, प्रभाग 22 कासेवाडी-डायस प्लॉटमध्ये काँग्रेससह शिवसेना मनसेचे उमेदवार ‘पंजा’ चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर प्रभाग क्रमक 40 कोथरूड येवलेवाडी, प्रभाग क्रमांक 33 शिवणे-खडकवासला, प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी-माळवाडी व प्रभाग क्रमांक 4 हडपसर-सातववाडी या प्रभागांत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार ‘मशाल’ घेऊन मैदानात उतरले आहेत. तर प्रभाग 31 आणि 32 मध्ये मनसेच्या ‘इंजिन’ या चिन्हावर उमेदवार लढणार आहेत.
16 ठिकाणी विरुद्ध लढती ठाम
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आधीच उमेदवारांना एबी फॉर्म वाटप झाले. ज्या ठिकाणी उमेदवारी दिली, तेथे उमेदवारांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे ‘मैत्रीपूर्ण लढत’ या नावाखाली एकमेकांविरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय झाला. परिणामी 16 ठिकाणी ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ समोरासमोर उभी ठाकणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 138 जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष 43 जागांवर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रमुख लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे महापालिकेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून जाहीर केले आहे. भाजपने 158 जागांवर तर रिपाइंने 7 जागांवर उमेदवार दिले आहेत. भाजपच्या दोन जागा बिनविरोध निवडल्या आहेत. महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 138 जागांवर उमेदवार उभे केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 43 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने 91 जागांवर उमेदवार उभे केले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 71 जागांवर तर मनसेने 44 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने 118 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.