

पुणे : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात सत्तासंघर्षापेक्षा श्रीमंतीचीच स्पर्धा रंगल्याची चर्चा सुरू आहे. भाजपने नव्या पिढीला संधी देताना कोट्यवधींच्या मालमत्ताधारक उमेदवारांना तिकीट दिल्याने ‘वंशपरंपरागत राजकारणाचा’ मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
माजी राज्यमंत्री, आमदार, खासदार यांच्या घरातील सदस्यांना पसंती देताना पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांनाही मागे टाकल्याचे दिसते. यात वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या नावावर तब्बल 271 कोटी 85 लाख रुपयांची मालमत्ता आहे. पुणे महापालिका निवडणुकांत इतक्या प्रचंड संपत्तीचा उमेदवार क्वचितच पाहायला मिळाला आहे.
एम.टेक पदवीधारक असलेले सुरेंद्र पठारे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, इनोव्हा क्रिस्टा अशी कोट्यवधींची वाहनं, पावणेदोन किलो सोने आणि अफाट संपत्ती त्यांच्याकडे आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून, या प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातल्याची चर्चा आहे. त्यांच्या पाठोपाठ पत्नी ऐश्वर्या पठारे आणि एका नातेवाईकालाही उमेदवारी मिळाली आहे.
भाजपने इतर पक्षातून आलेल्या तब्बल 25 जणांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. पेठांमध्येही घराणेशाहीला प्राधान्य देत शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई प्रभागातून नव्या चेहऱ्यांच्या नावाखाली राजकीय घराण्यांनाच पुढे केले आहे. या यादीत सून स्वरदा बापट, कुणाल टिळक, सायली वांजळे आणि माजी राज्यमंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार यांचा समावेश आहे.
दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे या 77 कोटी 65 लाख रुपयांच्या मालमत्तेसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजपने 41 प्रभागांत 165 जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून, मित्रपक्ष आरपीआयला दिलेल्या 9 जागाही कमळचिन्हावरूनच लढवल्या जात आहेत.
दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांच्या नावावर 11 कोटी 22 लाखांची कौटुंबिक मालमत्ता असून, क्रेटा कार, दुचाकी, 13 तोळे सोने आणि 87 लाखांचे विनातारण कर्ज आहे. तर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांच्याकडे 45 लाखांची बीएमडब्ल्यू असून त्यांच्यावर कोणतीही गुन्हे नोंद नाहीत.