

भिगवण : उजनी जलाशयातील निळ्या पूररेषेत अतिक्रमण करणाऱ्यावर जलसंपदा विभागाने शनिवारी (दि. 3) मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमणांवर हतोडा मारला. या कारवाईत सिद्धेश्वर प्लास्टिक कारखानाच उद्ध्वस्त करून टाकण्यात आला आहे.
वेळोवेळी अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा देऊन व गुन्हा दाखल करून देखील त्याला न जुमानता अतिक्रमण काढण्याऐवजी ते वाढविणे सुरूच ठेवण्यात आले होते. यावरून शनिवारी धाडसी कारवाई करण्यात येऊन प्लास्टिक कारखाना भुईसपाट करण्यात आला.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विभागाचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सु. स. खांडेकर, उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे, उपविभागीय अभियंता नितीन खाडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
भिगवण-बारामती राज्यमार्गावर, परंतु उजनी जलाशय क्षेत्रात भराव टाकून निळ्या पूररेषेत हे अतिक्रमण प्रवीण चौंडकर, श्री. भापकर (भिगवण, ता. इंदापूर) यांनी केले होते. याबाबत भीमा उपसा सिंचन उपविभाग क्र. 4 चे उपविभागीय अभियंता नितीन खाडे यांनी अतिक्रमण काढण्याच्या लेखी नोटिसा बजावल्या होत्या. तरी देखील अतिक्रमण न काढता उलट त्यात वाढ केली जात होती. यावरून उपविभागीय अभियंता यांनी भिगवण पोलिसात गुन्हा दाखल केला होता.
यालाही न जुमानता अतिक्रमण सुरूच होते. अखेर शनिवारी जलसंपदा विभाग मोठा ताफा घेऊनच घटनास्थळी दाखल झाला आणि अतिक्रमणांवर हातोडा मारण्यास सुरुवात केली.
स्थानिक पोलिसांचे संरक्षण न मिळाल्याने मंडळ स्तरावरून ग््राामीण पोलिस अधीक्षकांना पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून वीटभट्ट्या व बांधकामे केली असल्याने त्यांनाही अतिक्रमण काढण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, त्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे खाडे यांनी सांगितले.