

पुणे : पहिल्या ‘एपी प्रीमीअर लीग’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-20 स्पर्धेत हॉकआय क्रिकेट क्लब आणि रॉयल स्ट्रायकर्स क्लब या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
या स्पर्धेत पंकज जोशी याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर हॉकआय क्रिकेट क्लबने फाल्कन फ्लेम्सचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना फाल्कन फ्लेम्सने 145 धावा धावफलकावर लावल्या. विवेक नागदा याने 86 धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला.
पंकज जोशी याने 17 धावांत चार गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली. हे लक्ष्य हॉकआय क्रिकेट क्लबने 16.5 षटकात व 4 गडी गमावून पूर्ण केले. अपुर्व जोशी (नाबाद 47 धावा) आणि नचिकेत परचुरे (नाबाद 43 धावा) व विष्णू गावणकर (27 धावा) यांनी आवश्यक धावा जमवून संघाचा विजय सोपा केला.
रोहित तिवारी याने केलेल्या नाबाद 59 धावांच्या जोरावर रॉयल स्ट्रायकर्स क्लबने गणराज क्रिकेट क्लबचा 8 गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणाऱ्या गणराज क्रिकेट क्लबचा डाव 18.3 षटकात 120 धावांवर संपुष्टात आला. आशिष आनंद याने 55 धावा आणि प्रसाद गलांगे 41 धावा करून संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली.
हे आव्हान रॉयल स्ट्रायकर्स क्लबने 15.3 षटकात व 2 गडी गमावून सहज पूर्ण केले. रोहीत तिवारी याने 36 चेंडूत 8 चौकार आणि एक षटकारासह नाबाद 59 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुने किरण होळकर याने नाबाद 44 धावांची खेळी करून संघाचा विजय निश्चित केला.