

भिगवण: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाणीसाठा पुढील वर्षभर पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता यंदा उजनीचे पाणी दुष्काळाचे केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
उजनीतील मृतसाठा ६३ व उपयुक्त साठा ६० टीएमसी आहे. सध्या उजनीत अंदाजे ९० टक्क्यांवर पाणीसाठा आहे. झालेल्या निर्णयानुसार उपलब्ध पाणीसाठ्याच्या दहा टक्के पाणीसाठा पूर्णपणे राखीव ठेवला जाणार आहे. उर्वरित पाण्याचा वापर शेती, औद्योगिकीकरण व इतर गोष्टीसाठी वापरात येणार आहे असे समजते.
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याने धरणावर अवलंबून असणारी पुणे,सोलापुर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पिके मात्र धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कमी पर्जन्यमानामुळे सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
प्रशासन आता दुष्काळी उपाययोजनांच्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत म्हणजे ऑगस्ट २०२७ पर्यंत जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी पाणी राखीव ठेवले जाणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका तिन्ही जिल्ह्यातील ऊस पट्ट्याला बसणार आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर नगदी पिकेही धोक्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे रब्बीसाठी सोलापूरला पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. साधारणपणे ऑक्टोबरनंतर शेतीसाठी पाणी आवर्तन व वापर बंद करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणी फक्त पिण्यासाठीच वापरले जाणार जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
संघर्षाची चिन्हे
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उजनीच्या पाण्याचे नियोजन करताना प्रथम पिण्यासाठी नंतर उद्योगासाठी त्यानंतर जनावरांसाठी पिण्यासाठी, चाऱ्यासाठी व नंतर पाणी शिल्लक राहिलं तर त्याचा शेतीच्या सिंचनासाठी विचार केला जाणार आहे. यातून पाण्यासाठी संघर्ष निर्माण होणार आहे. एक वेळ औद्योगिकीकरणाचे पाणी बंद करा पण शेतीला द्या ही मागणी पुढे येऊ शकते.