

आळेफाटा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना नुकत्याच संपलेल्या गणेशोत्सवात फुलांना अपेक्षित बाजारभाव मिळाला नाही. किलोमागे केवळ ३० रुपयांपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. आता नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांची मागणी वाढून चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव, शिंगवे, वळती, नागापूर, रांजणी आणि थोरांदळे परिसरात शेतकरी श्रावण महिन्यापासूनच विविध सणांचा हंगाम लक्षात घेऊन झेंडूची लागवड करतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा या सणांमध्ये फुलांना मोठी मागणी असते. या काळात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने शेतकरी पिकाचे नियोजन करतात.
यंदाही अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या लागवडीसाठी मोठा खर्च केला आहे. मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन व्यवस्था, महागडी रोपे आणि इतर निविष्ठांवर खर्च करून पिकाची जोपासना केली. मात्र, गणेशोत्सवात अपेक्षित दर न मिळाल्याने उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. सणासुदीच्या काळात चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा असताना कमी दरामुळे त्यांच्या पदरी निराशा आली.
आता नवरात्रोत्सव आणि त्यानंतर दसरा सणाच्या काळात झेंडूच्या फुलांना मागणी वाढण्याची शक्यता आहे. देवीच्या पूजेसाठी, मंदिरांच्या सजावटीसाठी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी नवरात्रोत्सवात फुलांची खरेदी केली जाते. दसऱ्यालाही झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने या काळात बाजारभाव सुधारतील, अशी अपेक्षा उत्पादकांना आहे.
सध्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये झेंडूचे मळे बहरले आहेत. फुलांचे उत्पादन तयार होत असताना बाजारपेठेत किती मागणी निर्माण होते आणि त्यानुसार दर किती वाढतात, यावर शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे गणित अवलंबून आहे.
खर्चाच्या तुलनेत भाव मिळण्याची अपेक्षा
झेंडूची लागवड, पीक जोपासना, फुलांची तोडणी आणि बाजारपेठेपर्यंत वाहतूक यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे चांगले उत्पादन मिळण्याबरोबरच त्याला योग्य बाजारभाव मिळणेही महत्त्वाचे आहे. गणेशोत्सवातील कमी दरामुळे झालेली आर्थिक निराशा नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या काळात भरून निघावी, अशी अपेक्षा झेंडू उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.