

भरत मल्लाव
भिगवण: कोरोनाकाळात औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखाने बंद असल्याने उजनी धरणातील प्रदूषणात लक्षणीय घट झाली होती. पाणी काहिसे स्वच्छ होत जैवविविधतेला पुन्हा संजीवनी मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, सध्या पुन्हा एकदा औद्योगिक व शहरी सांडपाण्यामुळे उजनी धरणाचा श्वास गुदमरू लागला असून, कमालीच्या प्रदूषणामुळे ‘उजनी’चं पाणी थेट मृतावस्थेच्या दिशेने जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
भिगवण व कुंभारगाव परिसरातील उजनी पाणलोट क्षेत्रात पाण्याचा टीडीएस 700 पर्यंत, तर पीएच जवळपास 9 पर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. भारतातील नामांकित बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यांच्या पाणी तपासणीतून ही अत्यंत गंभीर स्थिती उघडकीस आली असून, यामुळे उजनी धरणातील संपूर्ण जैवविविधतेवर मोठा धोका निर्माण झाला आहे.
‘डब्ल्यूएचओ’ निकषांनुसार पाणी धोक्याच्या पातळीवर
जागतिक आरोग्य संघटनेनुसार ( थकज) पिण्याच्या पाण्यासाठी टीडीएसची आदर्श मर्यादा 300 पीपीएम असावी. 50 ते 150 पीपीएम : उत्कृष्ट, 150 ते 250 पीपीएम : चांगले, 250 ते 300 पीपीएम : योग्य, 300 ते 500 पीपीएम : असुरक्षित, 1200 पीपीएमपेक्षा अधिक : अस्वीकार्य या पातळींपैकी उजनी धरणातील पाण्याचा टीडीएस 624 ते 700 पीपीएम दरम्यान आढळून आल्याने हे पाणी थेट धोकादायक श्रेणीत मोडत आहे. पाण्याचा पीएच 7 तटस्थ मानला जातो. मात्र, उजनी धरणातील पाण्याचा पीएच 8.6 ते 8.7 दरम्यान असल्याने हे पाणी अत्यंत क्षारीय (अल्कधर्मी) बनले आहे.
देशी मासे पुनरुज्जीवन प्रकल्प धोक्यात
बीएनएचएस व सिप्ला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उजनीतील पर्यावरणाला घातक ठरणारे मांगूर व सकर माऊथ कॅटफिश नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच नामशेष होत चाललेल्या देशी व प्रमुख कार्प जातींचे मासे पुनरुज्जीवित करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. मात्र, वाढत्या प्रदूषणामुळे शास्त्रज्ञ हतबल झालेत. ‘पाणीच जर इतके प्रदूषित असेल, तर मासे पुनरुज्जीवित करायचे तरी कसे?’ असा प्रश्न उभा ठाकला. पळसदेव परिसरात तुलनेने कमी प्रदूषण (टीडीएस 400, पीएच 7.5) आढळले असून, त्या भागात देशी मासे संवर्धनाचा प्रयत्न केला जाणार आहे.
डॉ. काटवटे यांच्या नजरेतून...
डॉ. काटवटे यांच्या माहितीनुसार उजनी धरणाच्या घेतलेल्या पाणी नमुन्यात विरघळलेला ऑक्सिजन - 5.2-5.5 मिलीग््रााम/लि. असून हा प्रकार अधिवास धोक्यात आल्याचे दर्शवत आहे. जलचरांसाठी तणावपूर्ण स्थितीत संक्रमण होत आहे. पीएच - 8.6 - 8.7 (अत्यंत क्षारीय वातावरण दर्शवत असून, अल्कधर्मी कचरा सोडल्यामुळे असू शकते. टीडीएस - 624-700 मिळाल्याने जलचरांसाठी उच्च धोका निर्माण करते, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खराब असते. ओआरपी मूल्य - 147-168 एमव्ही म्हणजे पाण्यात प्रक्रिया न केलेले सांडपाणी व अत्यंत खराब पाणी/पाणथळ जागेची स्थिती दर्शवत आहे.
ऑइलपेंटसारखा हिरवा तवंग; जलचरांसाठी शेवटची घंटा
‘बीएनएचएस’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे व त्यांच्या पथकाने भिगवण, कुंभारगाव, डाळज, कात्रज, टाकळी ते पळसदेवदरम्यान होडीने प्रवास करून उजनी धरणाच्या पाण्याची पाहणी व नमुने घेतले. या पथकात वैष्णवी पाटील, विधी, मॅकलेन व बालाजी सुरवसे यांचा समावेश होता. या पाहणीत पाण्याच्या पृष्ठभागावर ऑइलपेंटसारखा दाट, हिरव्या रंगाचा हानिकारक अल्कल तवंग मोठ्या प्रमाणात साचलेला आढळून आला. सामान्यतः उजनी धरणातील पाण्याचा टीडीएस सुमारे 300च्या आसपास असतो. मात्र, तो आता 700 टीडीएसपर्यंत पोहोचल्याने हे पाणी मानवी आरोग्य, मासे तसेच इतर जलचरांसाठी अत्यंत घातक ठरत असल्याचे डॉ. काटवटे यांनी स्पष्ट केले. ‘ही स्थिती कायम राहिली, तर येत्या काही दिवसांत उजनी धरणातील मासे तग धरू शकणार नाहीत,’ असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.