

Suresh Kalmadi Passes away: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे ३ वाजता 81 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव पुण्यातील त्यांच्या घरी कलमाडी हाऊस इथं ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर दुपारी ३.३० ला पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
सुरेश कलमाडी हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. त्यांनी दीर्घ काळ पुण्याचे खासदार म्हणून काम केलं होतं. त्यांनी रेल्वे राज्य मंत्री पद देखील भूषवलं होतं. त्याचबरोबर ते भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्षही होते. त्यांच्या कार्यकाळातच भारताने कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन केलं होतं.
मात्र याच कॉमनवेल्थमध्ये आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यांना या प्रकरणी २०११ मध्ये अटक देखील झाली होती. यानंतर पक्षाने त्यांना निलंबित केलं होतं.
यानंतर पुण्याचे सर्वेसर्वा म्हणून संबोधल्या गेलेल्या सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकीर्दच संपुष्टात आली. या प्रकरणाचा तब्बल १५ वर्षानंतर ईडी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आला. यात सुरेश कलमाडी यांना क्लीन चीट देण्यात आली. या निर्णयानंतर पुण्यात कलमाडी समर्थकांनी जल्लोष केला होता. मात्र जोपर्यंत हा निकाल लागला तोपर्यंत कलमाडी यांचे संपुर्ण राजकीय कारकीर्द संपुष्टात आली होती.
सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला. ते राजकारणात येण्यापूर्वी भारतीय वायू दलात पायलट म्हणून काम करत होते. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी १९८२ ते १९९६ पर्यंत राज्य सभा खासदार म्हणून सेवा केली. त्यांनी १९९६ आणि २००४ मध्ये लोकसभा लढवली. राजकाराणापलिकडे सुरेश कलमाडी यांनी एक क्रीडा प्रशासक म्हणून आपली ओळख निर्माण केली. सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हल आणि पुणे मॅरेथॉन याच्या माध्यामातून पुण्याला एक जागतिक ओळख निर्माण करून दिली.