

सुवर्णा चव्हाण
पुणे: व्हॉट्सअपवर उमेदवारांच्या प्रचारांसाठीचे ऑडीओ क्लिप्स आपण ऐकलेच असतील... रिक्षा, व्हॅनमधून आपल्याला प्रचारगीतांचा आवाज ऐकू येत असेलच... सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, या रणधुमाळीत कलाकारांचीही एंट्री झाली आहे.
प्रचारगीते, ऑडीओ क्लिप्स, व्हिडीओ, दोन ते तीन मिनिटांचे माहितीपट, पथनाट्य, पॉडकास्ट अन् प्रचारसभांचे सूत्रसंचालन यात कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या धुरळ्यात उमेदवारांसाठी कलाकारांना प्रचारगीत तयार करण्यापासून ते प्रचारासाठीच्या ऑडीओ क्लिप्स तयार करण्यापर्यंतचे काम मिळाले आहे. यामुळे कलाकारांचे चांगले अर्थार्जनही होत आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रभागांत सर्वपक्षीय उमेदवारांचा जोरदार प्रचार पाहायला मिळत आहे. उमेदरावांच्या प्रचारमोहिमांना सुरुवात झाली असून, लोककलावंत, नाट्यकर्मी, निवेदक, गायक, वादक... असे फक्त पुण्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील कलाकार प्रचारासाठीच्या कामात व्यग््रा आहेत. अगदी ग््राामीण भागातील कलाकारांनाही ऑडीओ क्लिप्सला आवाज देणे असो वा प्रचारगीतांचे गायन... असे काम मिळाले आहे. याविषयी कलाकार रिद्धी कुलकर्णी म्हणाल्या, प्रचारासाठीच्या सर्वच माध्यमांसाठी मी आवाज देण्याचे काम करत आहे. ऑडीओ क्लिप्ससह माहितीपटांसाठी मी आवाज देत आहे. उमेदवारांकडून प्रचारासाठी दोन ते तीन मिनिटांचे माहितीपट तयार करून घेतले जात आहेत. त्यातून उमेदवारांच्या माहितीपासून ते त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली जात असून, काही माहितीपटांनाही मी आवाज दिला आहे.
प्रचारगीतांचेही काम जोरात
प्रचारातील महत्त्वाचा भाग म्हणजे प्रचारगीते. प्रभागात फिरणाऱ्या रिक्षा आणि व्हॅनमधील एलईडी स्क्रीनवर ही प्रचारगीते दाखवली जात आहेत. वेगवेगळ्या थीमवर ही प्रचारगीते तयार केली आहेत. काही कलाकार उमेदवारांच्या मागणीप्रमाणे गीतांचे लेखन करत आहेत. त्याला संगीत देण्याचे काम काही कलाकार करत आहेत, तर गायक-गायिकांच्या आवाजात ही एक ते दीड मिनिटांची गीते रेकॉर्ड केली जात असून, सध्या काही उमेदवारांची प्रचारगीते तयार झाली आहेत. काही उमेदवारांच्या प्रचारगीतांचे रेकॉर्डिंग पुण्यातील विविध स्टुडिओजमध्ये सुरू आहे.
जवळपास सर्वच उमेदवारांसाठी व्हिडीओ, ऑडीओ क्लिप्स त्यांच्या टीममार्फत तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी व्हाइस ओव्हर आर्टिस्ट आवाज देत आहेत. तसेच गायकांच्या आवाजात प्रचारगीत रेकॉर्ड करण्यात येत असून, पुण्यातील 22 हून अधिक स्टुडिओजमध्ये सध्या रेकॉर्डिंगचे काम सुरू आहे. याशिवाय प्रचारसभांचे सूत्रसंचालन, तर काही कलाकार प्रभागात सादर होणाऱ्या पथनाट्यांमध्ये काम करत आहेत. अनेक कलाकारांना प्रचारासाठीचे काम मिळाले आहे आणि प्रचारांच्या कामांसाठी त्यांना चांगले मानधन मिळत आहे.
योगेश सुपेकर, अध्यक्ष, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन
मी आतापर्यंत 28 उमेदवारांच्या ऑडीओ क्लिप्ससाठी आवाज दिला आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांच्या ऑडीओ क्लिप्ससाठी काम केले आहे. या ऑडीओ क्लिप्स साधारणपणे दोन ते बारा मिनिटांच्या असतात. पहिले संहिता आणि संवादलेखन केले जाते. त्यानंतर स्टुडिओमध्ये व्हाइस ओव्हर आर्टिस्टच्या आवाजात त्याचे रेकॉर्डिंग होते. सध्या हे ऑडीओ क्लिप्स व्हॉट्सअपवर पाठवले जात असून, प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रिक्षा आणि व्हॅनवरही या ऑडीओ क्लिप्स लावल्या जात आहेत.
अन्वय बेंद्रे, व्हाइस ओव्हर आर्टिस्ट