

पुणे: ड्रिंक ॲन्ड ड्राईव्ह कारवाईदरम्यान हवाई दलातील एका शिपायाने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच, बेथ ॲनालायझर मशिनची तोडफोड करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना 3 जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सीसीडी चौक, विमाननगर परिसरात घडली.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी हवाई दलातील शिपायाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत विमानतळ वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार आनंद गोसावी यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजय कुमार यादव (वय 35) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यपी वाहनचालकांकडून होणारे गंभीर अपघात रोखण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव केली असून, नाकाबंदी करून वाहनचालकांची बेथ ॲनालायजर यंत्राद्वारे तपासणी करण्यात येत आहे.
शनिवारी (दि.3 डिसेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास विमानतळ वाहतूक विभागाने विमाननगर भागात नाकांबदी करून वाहनचालकांची तपासणी सुरू केली. त्या वेळी हवाई दलातील शिपाई यादव तेथून चारचाकी गाडी घेऊन निघाला होता. लोहगाव येथील हवाई दलाच्या वसाहतीत तो राहायला आहे. वाहतूक शाखेतील हवालदार गोसावी यांनी नाकाबंदीत वाहन अडवून तपासणी सुरू केली. तेव्हा शिपायाने गोसावी यांना धक्काबुक्की केली. त्यांच्याकडील बेथ ॲनालायजर यंत्र हिसकावून घेतले, तसेच यंत्राची तोडफोड केली.
त्यावेळी नाकाबंदीतील पोलिसांनी शिपायाला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच विमाननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत. याप्रकरणी हवाई दलातील शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करून नोटीस बजावण्यात आली आहे.