

पुणे: आर्थिक कारणातून झालेल्या वादातून एका तरुणाला विवस्त्र करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर तरुणाचे मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले. तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. ही धक्कादायक घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात घडली आहे.
याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी आयुष कामठे, अभी म्हस्के, अभी पाटील, मंगेश माने, कौशल ऊर्फ ऋषी मारे आणि इतर चौघे अनोळखी अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत खडीमशिन चौक कोंढवा येथील 31 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी 31 वर्षीय तरुण वाहन खरेदी-विक्री व्यवसाय करतो. तो कोंढवा भागात राहायला आहे. आरोपी तरुणाच्या ओळखीचे आहेत. आर्थिक वादातून आरोपींनी 31 डिसेंबर रोजी तरुणाला मारहाण करून त्याचे मोटारीतून अपहरण केले. रात्री 11 च्या सुमारास कात्रज-कोंढवा रोडरील गोकुळनगर परिसरातल्या मोकळ्या मैदानात आरोपी तरुणाला घेऊन गेले. तेथे तरुणाला विवस्त्र करून आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यांतर तरुणाचे मोबाइलवरून चित्रीकरण केले. त्याला शिवीगाळ करून चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली.
आरोपी मंगेश मानेने मोटारीत ठेवलेल्या पिस्तुलाचा धाक तरुणला दाखवला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिल्यास जिवे मारू, अशी धमकी दिली. तरुणावर गोळीबार केला. या घटनेनंतर तरुण घाबरला होता. त्याने रविवारी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर काळंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक खराडे तपास करत आहेत.
चाबूकस्वारच्या खुनातील आरोपी
तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्यानंतर त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केल्यानंतर गोळीबार करणाऱ्या आरोपीपैकी काही जण आकाश चाबुकस्वार (वय21) याच्या खुनातील आहेत. मंगेश माने, अभी पाटील, ऋषीकेश मारे, अशी त्यांचे नावे आहेत. अशी माहिती येवलेवाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर काळंगे यांनी दिली.