

पुणे : अस्थि विकाराने ग्रस्त असलेल्या दोन वर्षांच्या चिमुरडीचा आईने दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना वारजे भागात घडली. मुलीचा खून केल्यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शारवी आदिनाथ देवडकर (वय 2), तिची आई छाया (वय 28) अशी या दुर्देवी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहे. याबाबत आदिनाथ संताराम देवडकर (वय 30,रा. कारगिल फार्म हाऊसजवळ, गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नी छाया देवडकर हिच्या विरुद्ध मुलीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ देवडकर, त्यांची पत्नी छाया आणि मुलगी शारवी गोकुळनगर पठार परिसरात राहायला आहेत. शारवीला अस्थिविकार होता. अस्थिविकारावर उपचार सुरू होते. मुलीला झालेल्या अस्थिविकारामुळे छाया नैराश्यात होती.
शुक्रवारी (2 जानेवारी) आदिनाथ कामानिमित्त बाहेर पडले. दुपारी दीडच्या सुमारास तो कामावरून घरी आला. तेव्हा शारवी घरातील पाळण्यात निपचित पडली होती. तिचे हात पाय चिकटपट्टीने बांधण्यात आले होते. पत्नी छायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर घाबरलेल्या आदिनाथ याने पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त जानवे, पोलिस निरीक्षक धेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शारवीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे तपासणीत उघडकीस आले. त्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक कापसे तपास करत आहेत.