

पुणे : दीर्घकाळापासून पदोन्नतीची प्रतीक्षा करणाऱ्या पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अखेर मोठी आनंदवार्ता आली आहे.
विविध विभागांतील 600 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर लाडे-पागे समितीच्या शिफारशीनुसार तसेच अनुकंपा तत्त्वावर 632 वारसांना नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्या उपस्थितीत झालेल्या पदोन्नती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 2025-26 वर्षातील पदोन्नती प्रक्रियेचा सविस्तर आढावा बैठकीत मांडण्यात आला.
प्रक्रिया पूर्णतः नियमबद्ध, पारदर्शक आणि निकषांच्या आधारे केल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या मोठ्या निर्णयात मुद्रणालय, नगरसचिव विभाग, अभियंता संवर्ग अशा महत्त्वाच्या विभागांतील पदोन्नती आदेश जारी करण्यात आले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांनाही हिरवा कंदील मिळाल्याने अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.