खडकवासला ; पुढारी वृत्तसेवा खडकवासला धरणाच्या भिंती खालील सांडव्यातील मुठा नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेलेल्या वारजे येथील दोन तरुणांचा खोल पाण्यात बुडून मुत्यू झाला. विजय नागनाथ रोकडे (वय २३ रा. रामनगर वारजे) व राँबिन केशव वाघमारे (वय २५, रा. बराटे चाळ वारजे गाव) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघे मित्र असुन पेंटिंगची कामे करत असत.
या घटनेनंतर खडकवासला धरण व धरणाखालील मुठा नदीच्या पात्र, डबकी, डोहात तसेच मुठा कालव्याच्या धोकादायक खोल पाण्यात पोहण्यासाठी तसेच आंघोळीसाठी कोणीही उतरू नये असे आवाहन खडकवासला जलसंपदा विभागाने केले आहे.
कडक उन्हाळा सुरू झाल्याने पोहण्यासाठी खडकवासला धरण परिसरात दररोज शेकडो तरुण, विद्यार्थी गर्दी करत आहेत. या ठिकाणी दरवर्षी पंचवीस ते तीस जणांचा बुडून मुत्यू होत आहे. तरीही धोकादायक पाण्यात उतरून पोहण्यासाठी तरुण, विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत.
मृत विजय व राँबीन
यांची कपडे धरणाच्या सांडव्या लगतच्या खडकावर होती. आज (शनिवार) सकाळी एकाचा मुतदेह डोहात तरंगताना काही नागरिकांना दिसला. तेथील सुरक्षा रक्षकांनी याची माहिती उत्तमनगर पोलीसांना दिली. यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली.
काल ( दि. १ एप्रिल) दुपारी विजय व राँबीन हे खडकवासला धरणाखालील मुठा नदीच्या पात्रातील डोहात पोहण्यासाठी उतरले होते. डोहाच्या कडेला असलेल्या खडकावर दोघांचे कपडे काढुन ठेवले होते. डोहातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मुत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नांदेड सिटी येथील पीएम आरडीए ( पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी डोहातील दोन्ही मृतदेह बाहेर काढले.
उत्तमनगरचे पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, पोलीस हवालदार पंढरीनाथ कोळेकर, पोलीस जवान चेतन बराटे, गजानन चव्हाण व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने शोध मोहीम सुरू केली. ऐन गुढी पाडव्याच्या सणाच्या दिवशी दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.