मेट्रोच्या उद्घाटनाला बोलवले नाही तरी चालेल, पण… : देवेंद्र फडणवीस | पुढारी

मेट्रोच्या उद्घाटनाला बोलवले नाही तरी चालेल, पण... : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील मेट्रोच्या उद्घाटनाला आम्हाला बोलवले नाही, तरी चालेल. पण सर्व मेट्रो सुरू कराव्यात. मेट्रो ३ चा प्रश्न तातडीने निकालात काढावा. आतापर्यंत मेट्रो सुरू झाली असती. पण आता ती सुरू होण्यासाठी पुढील चार वर्षे लागतील, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (शनिवार) महाविकास आघाडी सरकारला लगावला. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की, जरुर त्यांनी मेट्रोचे उद्घाटन करावे, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, जनतेला माहिती आहे की दोन्ही मेट्रोचे काम मी सुरु केले आहे. मेट्रोचं काम वेगाने सुरु असताना या सरकारमध्ये ते रखडले होते. सरकारने श्रेय नक्की घ्यावे, पण अपश्रेयाचे भागीदार होऊ नये. सरकारने मेट्रो तीनचा प्रकल्प त्वरीत सुरु करावा. आरेमधील कारशेडचे काम ९ महिन्यामध्ये होऊ शकते. महत्त्वाची असलेली मेट्रो ३ सरकारने सुरु करून त्याच्या उद्घाटनाला आम्हाला बोलावले नाही तरी चालेल, असेही फडणवीस म्हणाले.

ते म्हणाले की, गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भगवं तेज अनुभवायला मिळतंय. मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होतोय. नवीन वर्ष सुख समृद्धी, आणि आरोग्यदायी जावो. मेट्रोच्या उद्घाटनाला आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल. पण सर्व मेट्रो सुरु करा. गृह विभागावर नाराजी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर कशाला बोलायचं. नवीन वर्षात आजचा संकल्प देशाकरता आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button